train-17-may-ff
train-17-may-ff

`भावी अधिकाऱ्यांचे` प्रचंड हाल : दिल्लीतून झाली सुटका.. पण रेल्वेने छळले होते

दिल्ली सरकार आणि रेल्वे या दोघांच्या भोंगळ कारभाराचा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला. काल सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना राहत असलेल्या भागांतून आंबेडकर स्टेडियम व इतर केंद्रांवर वैद्यकीय स्क्रीनिंगसाठी नेण्यात आले. मात्र दिल्ली सरकारने त्यांना ताटकळत ठेवले आणि त्यांची आरोग्य तपासणी संध्याकाळी 5 नंतर सुरु झाली

नवी दिल्ली :  यूपीएससीच्या तयारीसाठी आलेल्या आणि लाॅकडाऊनमुळे 24 मार्चपासून दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 1400 विद्यार्थ्यांचे काल रात्री परतीच्या प्रवासात विद्यार्थी विशेष रेल्वेगाडीत प्रचंड हाल झाले. स्लीपरचे डबे बंद ठेवून आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे तीन-तेरा वाजवून जनरलच्या डब्यांमध्ये अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले. रेल्वेने कबूल केल्याप्रमाणे रात्रीचे जेवण न दिल्याने काल सकाळपासून आज दुपारपर्यंत या मुलांना सक्तीचा उपवास घडला. राज्य शासनाच्या दिल्लीतील कार्यालयानेही या विद्यार्थ्यांना एका वेळचे जेवण देण्याचे कबूल केले होते. त्याचे काय झाले ते समजू शकलेले नाही.

हा सर्व दाहक प्रकार म्हणजे “दिल्लीतून झाली सुटका.. पण रेल्वेने छळले होते ““ अशा  प्रकारचा असल्याचा स्वानुभव विद्यार्थ्यांनी घेतला. महाराष्ट्र सरकारने प्रवास भाड्याचे पैसे देऊन आरक्षित केलेल्या विशेष रेल्वेगाडीबद्दल ही परिस्थिती असेल तर लाखो स्थलांतरित मजुरांची काय अवस्था होत असेल, असा सवाल डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

दिल्ली सरकार आणि रेल्वे या दोघांच्या भोंगळ कारभाराचा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला. काल सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना राहात असलेल्या भागांतून आंबेडकर स्टेडियम व इतर केंद्रांवर वैद्यकीय स्क्रीनिंगसाठी नेण्यात आले. मात्र दिल्ली सरकारने त्यांना ताटकळत ठेवले आणि त्यांची आरोग्य तपासणी संध्याकाळी 5 नंतर सुरु झाली. दिवसभर उपाशीपोटी ताटकळत बसावे लागलेले  हे विद्यार्थी बसमधून रात्री 9 नंतर पुरानी दिल्ली रेल्वे स्थानकावर गटागटाने पोचले. स्थानकावर जी स्पेशल असा टिळा लावलेली गाडी उभी होती, तिचे 22 पैकी 17  स्लीपर डबे रिकामे होते. बहुतांश विद्यार्थ्यांना जनरलच्या पाच डब्यांमध्ये बसविण्यात आले, असे सांगून विद्यार्थी समन्वयक राजेश बोनवटे यांनी सांगितले की डब्यांमध्ये धुळीचे साम्राज्य होते. शौचालयात पाणी नव्हते आणि डब्यांमध्ये आधीच कमालीची अस्वच्छता होती. गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही . अचानक गाडी सुटल्याने सकाळपासून उपाशी असलेल्या या विद्यार्थ्यांना नाश्त्याची पाकिटेही देता आली नाहीत.

या रेल्वे गाडीत अनेक विद्यार्थिनी होत्या मात्र रेल्वेची सुरक्षा नावाची चीज कोठेही अस्तित्वात नव्हती. एकेका सीटवर पाच ते सहा विद्यार्थी होते आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्यानंतर बाकांच्या खाली झोपून रात्र काढली. याबाबत तक्रारी केल्यानंतर आग्रा स्थानकावर पाच मिनिटासाठी गाडी थांबवण्यात आली आणि तेथे विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सर्व डब्यांमध्ये कसाबसा नाश्ता पाकिटे पोचवली, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. या सर्व प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी रात्रीपासून रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वेला अनेक ट्वीट केली पण रेल्वे प्रशासनाने या विद्यार्थी स्पेशल गाडीची काहीही दखल घेतली नाही.

युपीएससी परीक्षार्थींना घेऊन अखेर काल रेल्वे महाराष्ट्रकडे रवाना झाली. मात्र रेल्वे प्रशासन व दिल्ली सरकारच्या भोंगळ कारभाराने त्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागला तो अस्वीकारार्ह आणि निषेधार्ह आहे.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com