मराठा आरक्षण समितीचा महाराष्ट्र बंदचा इशारा.. - Maratha Reservation Committee warns of Maharashtra Bandh | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षण समितीचा महाराष्ट्र बंदचा इशारा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

मराठा मुलांच्या भावनेला वाव देण्यासाठी ता. 10 तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा आरक्षण समितीनं दिलं आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या ता. 9 ऑक्टोबरपर्यंत मान्य केल्या नाही तर ता. 10 तारखेला महाराष्ट्र बंद करणार, असा इशारा मराठा आरक्षण समितीनं दिला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती काम करत आहे. 

काल बीडमध्ये एका मुलाने आत्महत्या केली आहे. मराठा मुलांच्या भावनेला वाव देण्यासाठी ता. 10 तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा आरक्षण समितीनं दिलं आहे.  ईडब्लूएसअंतर्गत 10 टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केलं आहे. ते सरकारनं सुरू करावं, मराठा आरक्षणाबाबत अनेक मोर्च, आंदोलन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होत आहे. तरीही या राज्य सरकारला जाग येत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारनं मान्य न केल्यास  10 तारखेला महाराष्ट्र बंद करू असा इशारा मराठा आरक्षण समितीनं दिला आहे. या दिवशी महामार्गावर आंदोलन, आमदार, खासदारांना घेराव अशा कार्यक्रमांचे आयोजन समितीनं केलं आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार आहेत. 

मराठा आरक्षण प्रश्नाचे नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही. सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय यांनीही जबाबदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर उद्रेक होईल. त्याला जबाबदार कोण, लोक हातश झाल्यावर काय करणार, असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 

शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात तीन ऑक्टोबरला होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चाही केली. माजी सभापती सुनील काटकर, शरद काटकर, हरिष पाटणे उपस्थित होते. 

यावेळी उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या समाजात संताप निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला मराठा समाजातील प्रमुख लोकांची बैठक होत आहे. मुळात हा आरक्षणाचा प्रश्न निर्माणच व्हायला नको होता. मराठा समाजाची माफक मागणी होती, प्रत्येकाला ज्या पध्दतीने आरक्षण दिले त्यापध्दतीनेच आम्हालाही मिळावे.

संपूर्ण कष्ट करण्याची तयारी असताना ही या समाजावर अन्याय झाला असून हा समाज उपेक्षित राहिला आहे. प्रत्येक वेळी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की इतर लोकांकडून विरोधात मोर्चे काढले जातात, कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, आज बऱ्याशाच मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.  

विद्यार्थी कोणताही असू देत प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा व मेरिटवर निवड करा. मराठा समाजातील मुलाने कष्ट घेऊन चांगले मार्क मिळविले. पण त्याला अ न मिळाल्याने नैराश्य येते. काही लोक आत्महत्या करतात, काही नेस्तनाबूत होतात.

त्यामुळे मराठा समाजाच्या मुलाने आपली महत्वाकांक्षा कशी पूर्ण करायची, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, राज्य शासन, केंद्र शासन असून देत ही सर्व माणसेच आहेत. त्यांनी थोडेसे माणुसकीच्या दृष्टीने विचार करायला हवा. ते मराठा समाजात जन्माला आले असते तर आज जे माझे मत आहे, तेच मत त्यांचेही असते.  

पुण्यातील या बैठकीला मी जाणार असून तेथे ठोस चर्चा होईल. या  बेठकीला माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी असणार आहेत. त्यांचा अनुभव  लक्षात घेता मराठा आरक्षण प्रश्नासाठी नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही, सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय असेल यांनीही जबाबदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर उद्रेक होईल त्याला  जबाबदार कोण, लोक हातश झाल्यावर काय करणार, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख