मराठा आमदार, मंत्र्यांना प्रवेश बंद ; संभाजी ब्रिगेडचं निदर्शन.. - Maratha MLA ministers barred from entry ; Demonstration of Sambhaji Brigade | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आमदार, मंत्र्यांना प्रवेश बंद ; संभाजी ब्रिगेडचं निदर्शन..

गणेश पांडे
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ११) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात निदर्शने केली.

परभणी : मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ११) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात निदर्शने केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वोच्य न्यायालयामध्ये भंकमपणे बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत परभणीत शुक्रवारी (ता. ११) संभाजी ब्रिगेडकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून संभाजी ब्रिगेड व अनेक मराठा संघटनांनी आंदोलने केली व उपोषणे केली. आंदोलना दरम्यान मराठा युवक काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षण मिळविण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहूती दिली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्य न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू होती. परंतू महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्यावतीने शुक्रवारी करण्यात आला. मागील सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जो न्यायमुर्ती व वकील देण्यात आले होते.

त्यांना महाविकास आघाडीकडून बदलण्यात आले. हे सरकार मराठा समाजावर अन्याय करीत आहे, असे सांगत सर्वोच्य न्यायालयात प्रक्रिया चालू असताना महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गर होती. पण एका नटीच्या वादग्रस्त बोलण्याकडे सरकारने जास्त प्रमाणे लक्ष दिले तसेच राज्यमंत्री मंडळाकडे अनेक मराठा आमदार असूनही एकही मराठा आमदार, मंत्री मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करीत नाही. म्हणून येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड एकाही मराठा मंत्र्याला व राज्य सरकारमधील मंत्र्याला जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

 
मराठा समाजाला फडणवीस सरकारने न्याय देण्याचे काम केले. परंतू महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाला महत्व दिलेले दिसत नाही. लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुनश्च राज्य सरकाराने प्रयत्न करावे. अन्यथा, सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- बालाजी मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, परभणी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख