Maratha leaders should not make provocative speeches otherwise conflict will erupt warns Shendge | Sarkarnama

मराठा नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे करू नयेत, अन्यथा संघर्ष पेटेल : शेंडगे यांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

ओबीसींच्या आरक्षणाबद्दल मराठ्यांनी आक्षेप न घेण्याची शेंडगे यांची सूचना 

मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावे आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका होती. मात्र मराठा नेते आता प्रक्षोभक भाषणे करत आहेत. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहील, असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.

मुंबईत ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात शेंडगे यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत मते व्यक्त केली. ते म्हणाले, ``मराठा समाजाला आरक्षणासाठी मागास प्रवर्ग करण्यात आले.
एसईबीसी हे वेगळे आरक्षण नाही. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे आम्ही त्यावेळी म्हटले होतं. त्याचवेळी त्यावर उपाययोजना सुरू करायला सांगितल्या होत्या. त्यावेळी आमचं ऐकल नाही. आता ओबीसी आणि भटक्या समाजाचं आरक्षण बेकायदेशीर आहे, असे मराठी समाजाचे नेते बोलायला लागले आहेत. त्यातून संघर्ष उभा राहण्याचा धोका आहे.  

आमचे आरक्षण बेकायदेशीर ठरवायचं, हे योग्य नाही. मराठा नेते आता प्रक्षोभक भाषणे करत आहेत. ओबीसी आणि भटके समाज हे मान्य करणार नाही. मराठा समाजाचे आरक्षण आता घटनापीठाकडे गेले आहे. किती वर्षे चालेल ते माहीत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासांचे आरक्षण मराठ्यांना लागू करावे. त्यासाठी आधी हे आरक्षण घेण्यास बंदी घातलेला शासननिर्णय रद्द करावा लागेल. किमान या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील गरीब युवकांना होईल, असा सल्ला त्यांनी दिला.

राज्यात बेरोजगारी वाढली आहे. मेगाभरती आता सुरू केली पाहिजे. ही भरती बरीच वर्षे प्रलंबित आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत 12 टक्के जागा रिक्त ठेवा पण उरलेल्या 88 टक्के जागा भरा, अशी मागणी त्यांनी केली. धनगर समाजला अनुसूचित जातीत आरक्षण देण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. त्याचाही अध्यादेश काढण्यात यावा, असे त्यांनी सुचविले. आमच्या मागण्या सरकाने 30 तारखेपर्यंत  मान्य कराव्यात नाही तर आम्हला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्र सरकारमध्ये किती नोकर भरती बाकी आहे, याची श्वेत पत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख