मराठा समाजाचा आजपासून पु्न्हा एल्गार ; तुळजापुरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे तिसरे पर्व   - Maratha Kranti Thok Morcha starts from Tuljapur today | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजाचा आजपासून पु्न्हा एल्गार ; तुळजापुरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे तिसरे पर्व  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्च्यात्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आजपासून (ता.९) मराठा क्रांती ठोक मोर्च्यात्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हा एल्गार आता थांबणार नाही, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला. छत्रपती संभाजी राजे उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चैाकातून या मोर्चास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर आंदोलक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर तुळजाभवानी मंदीर परिसरात या मोर्चाचा समारोप होणार आहे.   
 
औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केरे पाटील यांनी तुळजापूरातून सुरू होणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाबद्दल माहिती दिली. पन्नास हजाराहून अधिक मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारने युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये, अशी आमची मागणी आहे.

पण सरकारने या परिक्षा घेण्याचा घाट घातला आहे. तेव्हा जिथे जिथे या परिक्षा घेतल्या जातील तिथे तिथे गनिमी काव्याने जाऊन त्या उधळण्याचे नियोजन मराठा क्रांती ठोक मोर्चाने केले आहे. आम्ही या परिक्षा कदापि होऊ देणार नाही, असेही केरे पाटील यांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठोक मोर्चाच्या वतीने राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा सज्ज झाला आहे.

सदावर्तेला ठोकू, सत्तारांना फिरू देणार नाही..

मराठा समाजाबद्दल, राजेंबद्दल गेल्या दोन-तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि त्या विरोधात याचिका दाखल केलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून अपशब्द वापरले जात आहेत. या सदावर्तेंना आम्ही ठोकल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही केरे पाटील यांनी यावेळी दिला.

शिवसेनेचे राज्यमंत्री यांनी मराठा तरूणाला केलेल्या आर्वाच्य शिवीगाळीचा जाब देखील आम्ही अब्दुल सत्तार यांना विचारणार आहोत. सत्तार यांच्या या विधानबद्दल शिवसेनेने त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, तसेच सत्तार यांनी मराठा समाजाचाी माफी मागावी, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा त्यांना महाराष्ट्रात तर फिरू देणार नाहीच, पण जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यत आम्ही त्यांच्याही घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे केरे पाटील यांनी सांगतिले. ओैंरंगाबादमध्ये मराठा आंदोलकाच्या समन्वयकाची बैठक झाली. मराठा आंदोलन पर्व तिसऱ्याचा प्रारंभ आजपासून तुळजापूर येथून होत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख