मराठा क्रांती मोर्चाची सोलापूर जिल्हा बंदची हाक - Maratha Kranti Morcha calls for bandh in Solapur district | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चाची सोलापूर जिल्हा बंदची हाक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सरकारने आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा, अन्यथा 21 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा बंद केला जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजीराव साखळकर यांनी दिला.

पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा, अन्यथा 21 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा बंद केला जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजीराव साखळकर यांनी आज दिला.

अकलूज तेथे आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बंदची हाक देण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगित केले आहे. यावर राज्य सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, राज्य सरकारने अध्यादेश काढावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत राज्यभरात आंदोलन करण्याचा ही इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा 21 सप्टेंबरपासून सोलापूर जिल्हयासह राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा ही साखळकर यांनी दिला आहे.
बैठकीस हर्षध भोसले, आबासाहेब वाघमारे, भोजराज माने, महेश डोंगरे, प्रवीण देशमुख, समाधान इंगोले देशमुख, अमर रेसवडकर, निनाद पाटील, श्रीनिवास पाटील आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले.

ते म्हणाले, "हा विषय अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता नव्हती. गेल्या वेळी विधीमंडळातल्या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. त्यावेळी आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होते. आज चित्र बदलले असले तरी सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाच मताचे आहेत,'' 

ठाकरे पुढे म्हणाले, "सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर  उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथे आपण जिंकलो. पहिल्या सरकारने त्यावेळी दिलेले वकिल आपण बदलेले नाहीत. उलट त्यात वाढ केली आहे. सर्वोत्तम वकिल दिले आहेत. काही संस्था - व्यक्तींनी आपल्या पसंतीचे वकिल दिले आहेत. हे सर्वजण आपापल्या पद्धतीने बाजू मांडत आहेत. न्यायालयात युक्तीवाद करायला आपण कमी पडलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र मोठ्या बेंचसमोर जायला परवानगी दिली आहे, ही लढाई आपण नक्की जिंकू,"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख