हनीट्रॅपचा पेन ड्राईव्ह आमच्याकडेही आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपला सूचक इशारा - Many people have the pen drive of honeytrap case says kamalnath | Politics Marathi News - Sarkarnama

हनीट्रॅपचा पेन ड्राईव्ह आमच्याकडेही आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपला सूचक इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 मे 2021

काँग्रेस आमदाराच्या बंगल्यात त्यांच्या मैत्रिणीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

भोपाळ : काँग्रेस आमदाराच्या बंगल्यात त्यांच्या मैत्रिणीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. संबंधित आमदारावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांना अडकवण्याचा आरोप काँग्रेसने केला असून माजी मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा पेन ड्राईव्ह आमच्याकडेही आहे, असा सूचक इशारा भाजप सरकारला दिला आहे. (Many people have the pen drive of honeytrap case says kamalnath)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमध्ये आमदार उमंग सिंघार (Umang Singhar) वनमंत्री होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बंगल्यात त्यांची मैत्रीण सोनिया भारव्दाज (Sonia Bhardwaj) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही महिला मागील काही दिवसांपासून त्यांच्या शाहपुरा येथील खासगी बंगल्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीवरून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा मध्य प्रदेशात सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी सिंघार यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.

हेही वाचा : लहान मुलांनाही ब्लॅक फंगसचा धोका; गुजरातमध्ये 13 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया

सोनिया यांची आई व मुलाने मात्र सिंघार यांची बाजू घेतली आहे. त्यांच्याविरोधात काही पुरावे नसताना गुन्हा दाखल केल्याचे मुलाने म्हटले आहे. तसेच तेच आता माझे पालक असल्याचे वक्तव्यही त्याने केले आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षानेही या प्रकरणात उडी घेतली आहे. गुरूवारी काँग्रेसच्या आमदारांनी कमलनाथ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या बैठकीत सरकार सिंघार यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत आमदारांनी मांडले. 

बैठकीत कमलनाथ यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यापर्यंत नेले जाईल असे सांगितले. तसेच या प्रकरणात सरकारने पातळी सोडून राजकारण करू नये, अन्यथा त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत. आमच्याकडेही हनीट्रॅपचे पेन ड्राईव्ह आहेत. पण आम्ही नेहमी नैतिकतेवर आधारित राजकारण केले आहे, असे वक्तव्य कमलनाथ यांनी केले. या बैठकीनंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरही चर्चा केली. 

अनेकांकडे हनीट्रॅपचे पेन ड्राईव्ह

वृत्तसंस्थेशी बोलताना कमलनाथ म्हणाले, 'अनेक लोकांकडे हनीट्रॅपचा पेनड्राईव्ह आहे. अनेक माध्यम प्रतिनिधींकडेही आहे. ते पहिल्यांदा पेनड्राईव्हमध्ये होते, नंतर ते प्रकरण न्यायालयात गेले.' कमलनाथ यांच्या वक्त्यव्यावरून आता वाद निर्माण झाला असून भाजपने त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. 

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, सिंघार व सोनिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळं त्या अनेकदा यापूर्वीही या बंगल्यात राहिल्या आहेत. घटना घडली त्यावेळी बंगल्यात नोकर व त्याची पत्नी होती. रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सोनिया यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नोकराच्या पत्नीने अनेकदा दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं नोकरीने सिंघार यांना याबाबत कळविले. त्यांनी एकाला तिथे पाठविले तेव्हा सोनिया यांनी गळफास घेतल्याचे समोर आलं.

आता मी सहन करू शकत नाही

सोनिया यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. 'तुम गुस्से में बहुत तेज हो, अब सहन नहीं कर सकती' असं चिठ्ठीत लिहिलं आहे. त्यामध्ये सिंघार यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे समजते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख