भाईचंद पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर माजी मंत्र्यासह अनेक आमदारांनी मारला हात?

अवसायकानेच केला गुंतवणूकदारांचा विश्वासघात
police1
police1

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचा (बीएचआर) अवसायक जितेंद्र कंडारे, सीए महावीर जैन, धरम किशोर सांखला, सुजीत सुभाष बाविस्कर (वाणी), विवेक ठाकरे अशा अटकेतील चौघांनाही आज (शनिवारी, ता. २८) पुणे न्यायालयात हजर केले असता, त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या साऱ्या प्रकारात मोठ्या प्रमाणात राजकीय व्यक्तींनी पतसंस्थेच्या मालमत्ता कवडीमोलाने विकत घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. यात महाराष्ट्रातील माजी मंत्री असलेल्या एका नेत्याचे नाव घेतले जात आहे. तसेच काही आमदारांनीही यात हात मारल्याची चर्चा आहे. पण त्यादृष्टीने अद्याप तपास यंत्रणेला पुरावे सापडलेले नाहीत.  

रंजना खंडेराव घोरपडे (निवृत्त माध्यमिक शिक्षिका, रा. वृंदावन सोसायटी, भोसलेनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून तब्बल १० जणांविरुद्ध २५ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीनुसार सुजित सुभाष बाविस्कर उर्फ वाणी, धर्म किशोर सांखला, महावीर मानक जैन, विवेक देविदास ठाकरे, अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश सांखला आदींनी मिळून १७ लाख ८ हजार ७४२ रुपयाचा अपहार व फसवणूक केलेली आहे. दरम्यान, या प्रकरणात फिर्यादी व त्यांची बहीण या दोघांनी मिळून गुंतवलेले १६ लाख ९० हजार १४२ रुपये विवेक ठाकरे याने अन्य संशयितांशी संगनमत करून पैसे मिळवून देण्यासाठी १८ हजार ६०० रुपये घेऊन फसवणूक व अपहार केला आहे. दरम्यान, अटकेतील चारही आरोपींना ६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक सुचिता खोकले तपास करीत आहेत.

दुसऱ्या दिवशीही तपासणी

जळगाव औद्योगीक वसाहत येथील बीएचआरचे मुख्य कार्यालय, विवेक ठाकरे यांचे गोलाणी मार्केटचे कार्यालय, सुनील झवर यांचे कार्यालय आदी ठिकाणी पोलिस पथके दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून होती. शनिवारी रात्री पथकांनी पुरावे, दस्तऐवजांचे गाठोडे बांधण्यास सुरवात केली होती. उशिरा रात्री पथके पुण्याला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

मालमत्ता कवडीमोलाने विकल्या...

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) चे अवसायिक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर यांच्यासह इतर संशयितांचे हात बीएचआरच्या नियोजनबद्द लुटीत सहभगाी असल्याचा दाट संशय तपास यंत्रणेला आहे. अटकेतील सुनील झंवर यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी दिली. अर्थात झंवर याच्यांसह बीएचआरच्या मालमत्तामध्ये रस असणाऱ्यांच्या संपतीवर आता सरकार जमा होण्याचे संकेत मिळाले आहे. जवळपास १ हजार कोटीची मालमत्ता त्याच त्या ठरावीक लोकांनीच कशा खरेदी केल्या याचा शोध घेतला जात आहे.

पतसंस्थेवर नियुक्त प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला होता. त्यानंतर बीएचआर या अवसायानात असलेल्या पतसंस्थे विरोधात व अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात १९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र व्यापी ‘धडकी भरो छत्री’ आंदोलन करण्यात आले होते. जितेंद्र कंडारे हे साशंक पद्धतीने काम करत असल्याने आम्हाला ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता. त्यावेळी ठेवीदारांनाकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या की, जितेंद्र कंडारे हे कर्जदारासोबत मिलीभगत करून ठेवीदारांना ठेवी परत करताना ठेवीच्या मूळ रकमेच्या केवळ ३० टक्के परत देतात आणि ठेवीदारांकडून ठेवीची १०० टक्के रक्कम प्राप्त झाल्याचे लिहून घेतात. तसेच ठेवीची पावती कर्जदाराला हस्तांतरित करून कर्ज रकमेतून वरती केल्याचे कागदोपत्री दर्शविले जात होते.


कंडारे मालामाल?
कर्ज नील झाल्याचे सर्टिफिकेट कर्जदाराला देखील दिले जात होते. मात्र, त्याच्या खात्यात तशी नोंद होत नव्हती. या व्यवहारात ठेवीदारांना ठेवीची दिलेली ३० टक्के रक्कम वगळून उरलेली ७० टक्के रकमेतील ३० ते ४० टक्के रक्कम श्री. कंडारे यांना कमिशन म्हणून रोख स्वरूपात मिळत असल्याचा आरोप होत होता. ही रक्कम बेहिशोबी असल्याने तिची नोंद कागदोपत्री कुठेही आढळत नाही. यातून श्री.कंडारे यांनी स्वतःची पत्नी आई-वडील मेहुना तसेच औरंगाबाद येथील जमीन खरेदी विक्री व्यवसाय करणारा भाऊच्या आणि जळगाव येथील दुकान व जागा खरेदी विक्री करणाऱ्या भावाच्या नावे अनेक ठिकाणी गुंतवणूक केली असल्याच्या माहितीवरुन तपासयंत्रणा त्याचा शोध आता घेत आहे.

झंवरच्या मागे कोण?
उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर म्हणुन प्रख्यात सुनील झवर यांनीच ‘बीएचआर’ सर्वात जास्त मालमत्ता खरेदी केल्याची माहिती असून तपास यंत्रणेने २०१५ नंतर झंवर यांनी पाळधी, नाशिक, मुंबई, पुणेसह इतर राज्यात खरेदी केलेल्या मालमत्ता आपल्या रडारवर घेतल्या आहेत. बीएचआरच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमंत्ता वारंवार ठराविक व्यक्तिंना मिळवून देण्यासाठी राजकिय वजन वापरले गेल्याची शक्यता असून झंवर यांचा गॉडफादर संदर्भात चर्चा असली तरी, तसे पुरावे शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेला आहे. अवसायक कंडारे आणि झंवर यांचे काही आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झाले आहेत का? याची देखील माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, सुनील झंवर यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटाके यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com