`खडसेंची खदखद भाजपला भोवणार; काही आमदार सेनेच्या संपर्कात` - many bjp mlas in contact with sena says minister Uday samant | Politics Marathi News - Sarkarnama

`खडसेंची खदखद भाजपला भोवणार; काही आमदार सेनेच्या संपर्कात`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

भाजपमध्ये जी काही खदखद सुरू आहे, ती आम्ही निर्माण करत नाही. मात्र, याचमुळे काही भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी रत्नागिरीत केला

रत्नागिरी ः एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाने भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. यात आज शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी उडी घेतली. भाजपमध्ये ज्येष्ठ असलेल्या खडसे यांच्यावर ही वेळ येत असेल, तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, अशी शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सामंत यांनी खडसेंना दिली.

भाजपमध्ये जी काही खदखद सुरू आहे, ती आम्ही निर्माण करत नाही. मात्र, याचमुळे काही भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी यावेळी केला; पण त्यांची नावे उघड करण्याची ही वेळ नाही, असेही सामंत यानी स्पष्ट केले.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी उपस्थित होते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात श्रेष्ठींकडे आपण दाद मागणार, असे स्फोटक वक्तव्य खडसे यांनी केले. तो अंगुलीनिर्देश देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. त्यावर घरची धुणी आम्ही रस्त्यावर धुत नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केला होता. भाजपमध्ये पक्षांतर्गत सुरू असलेल्या शीतयुद्धामध्ये आता शिवसेनेने उडी मारली आहे.

खडसे यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोडीमुळे ही वेळ येत असेल, तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे खडसेंनी भविष्यात काही विचार केला तर त्यांनी शिवसेनेत यावे, अशी ऑफर सामंत यांनी त्यांना दिली. ज्यांच्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, त्या खडसेंवर ही वेळ येणे दुर्दैवी आहे; पण खडसेंनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ असल्याचा उपरोधिक टोलाही श्री. सामंत यांनी फडणवीस यांना नाव न घेता लगावला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे काही काम नसल्याने विरोधकांना दुसरा मुद्दा नाही, असा उपरोधित टोला त्यांनी हाणला. संतमहंतांनी मुख्यमंत्र्यांना अयोद्धेत येण्यास बंदी घातली. या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री भूमिका जाहीर करतील, असेही सामंत यांनी सष्ट केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख