जुहीची सुनावणी अन् न्यायाधीशांसमोरच धरला 'लाल लाल होठों पे...' गाण्यावर ताल

जुही चावला यांच्या चित्रपटातील तीन गाणी गायल्यानंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले.
Man sings three songs during Juhi Chawlas virtual 5G case hearing
Man sings three songs during Juhi Chawlas virtual 5G case hearing

दिल्ली : अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) यांनी अनेक वाद निर्माण झालेल्या 5G नेटवर्कविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली आहे. भारतात 5G ची अंमलबजावणी करू नये, असे याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर आज व्हर्च्युअल सुनावणी झाली. पण सुनावणीदरम्यान अचानक एका व्यक्तीने जुही चावला यांच्या चित्रपटातील 'घुंघट की आड से...' हे गाणं गायला सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने आणखी दोनवेळा सुनावणीत अडथळे आण दोन गाणी म्हटली. त्यामुळं न्यायालयही गोंधळून गेलं. (Man sings three songs during Juhi Chawlas virtual 5G case hearing) 

पुढील काही वर्षांत भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये 5G नेटवर्कची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. पण याविरोधात काही पर्यावरणतज्ज्ञ पुढे आले आहेत. जुही चावला याही पर्यावरणप्रेमी म्हणून ओळखल्या जातात. मोबाईल टॅावरमधून बाहेर पडणारे रेडिएशन नागरिकांसाठी असुरक्षित आणि आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा जुही चावला यांनी याचिकेत केला आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विकासाच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारी त्यांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

या याचिकेवर आज व्हर्च्यूअल सुनावणी झाली. सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर काही वेळाने अचानक एका व्यक्तीने 'घुंघट की आड से...' हे गाणं गायला सुरूवात केली. हे गाणं जुहीच्या हम है राही प्यार के या चित्रपटातील आहे. त्यानंतर ही व्यक्ती व्हॅच्यूअल सुनावणीतून बाहेर पडली. पण पुन्हा जॅाईन होत त्याने 'लाल लाल होंठो पे...' हे गाणं सुरु केलं. तो पुन्हा बाहेर पडला. काही वेळाने तिसऱ्यांदा सुनावणीदरम्यान जॅाईन होत 'मेरी बन्नो की आयेगी बारात...' हे गाणं गायलं. तिन्ही गाणी जुही यांच्या चित्रपटातील आहेत. 

तीनवेळा घडलेल्या या प्रकारामुळे सुनावणीदरम्यान व्यत्यय आला. त्यामुळे सुनावणी थांबवावी लागली. या व्यक्तीला व्हर्च्यूअल सुनावणीतून काढण्यात आले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. पण या प्रकाराची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीरपणे दखल घेत चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस न्यायालयाने बजावली. या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

का आहे जुही चावला यांचा 5G ला विरोध?

आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. वायरलेस कम्युनिकेशनच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या अनेक उत्पादनांचा आम्ही वापर करत आहोत. पण हा वापर करताना त्याचा अतिरेक होऊ नये, याकडेही लक्ष्य देण्याची गरज आहे. आपल्याच संशोधन व अभ्यासातून वायरलेस उत्पादने आणि मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशन घातक असल्याचे जुही यांनी याचिकेत म्हटले आहे. 

तसेच 5G तंत्रज्ञान हे नागरिक, पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित आहे, ही ग्वाही संबंधित विभागाने द्यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच याच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी असा अभ्यास झाला नसल्यास सध्याच्या स्थितीत आणि भविष्याचा विचार करून पुरक अभ्यास होण्याची गरज आहे. लहान मुलांचे आरोग्य तसेच भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलांचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जुही चावला यांनी यापूर्वीही मोबाईल टॅावरमधून निघणाऱ्या रेडिएशनविरोधा आवाज उठवला आहे. पर्यावरणासाठी काही वर्षांपासून काम करत असून वायरलेस नेटवर्कविरोधात त्यांनी पहिल्यांदाच याचिका दाखल केली आहे.  

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com