मोदी मंत्रीमंडळातील अनेकांना मिळणार डच्चू! जनतेतील नाराजीने भाजप अस्वस्थ

मोदी सरकारवर गेल्या सात वर्षांत पहिल्यांदा कठोर टीका...
narendra modi 11
narendra modi 11

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार (Modi Govt) अपयशी ठरल्याचा ठपका बसू लागल्याने त्याचे राजकीय परिणामही आता होण्याची चिन्हे आहेत. यातून `ब्रॅंड मोदी`ला पुन्हा भक्क करण्यासाठी आणि सरकारच्या या अपयशातून सावरण्यासाठी अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा काही मंत्र्यांना तडाखा बसण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळ सध्या हादरले आहे. (Modi Govt fails in corona pandemic)

कोरोनाची पहिली लाट यशस्वीपणे परतवल्याचा दावा करत मोदी सरकारने आपली पाठ थोपटून घेतली पण दुसऱ्या लाटेने मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला. त्यात उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीमध्ये मृतदेह सोडून देण्याचे, अंत्यसंस्कारासाठी रिघ लागल्याची छायाचित्रे आणखीनच मानहानीकारक ठरली. भाजप नेत्यांना प्रचंड  टीका झेलावी लागली. लसीकरणाच्या पातळीवरही गोंधळ उडाला आणि या साऱ्या प्रकारात पश्चिम बंगालमध्ये राजकीय धुव्वा उडाला. यामुळे आता मोदी खडबडून जागे झाले आहे. जनता आपल्यावर नाराज आहे, याचा फिडबॅक त्यांच्यापर्यंत गेला असल्यानेच त्यांनी आता त्याची दखल घेण्याचे ठरवत टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  

स्वतःला प्रमाणपत्र देणे थांबवावे
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाबद्दल सामान्य लोकांमध्ये नाराजी आणि चीड असल्याचेही फीडबॅक भाजपकडे आले आहेत. त्यामुळेच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी सरकारमध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकताही मांडली जाते. स्वतःच स्वतःला प्रमाणपत्र देण्याचा प्रयोग यापुढे यशस्वी होईल का? याबद्दल शंका व्यक्त होते आहे. या संकटाच्या काळात देखील केंद्र सरकारची कमकुवत बाजू समोर आणणे म्हणजे थेट मोदींवर टीका, ही भाजपची भूमिका आहे. याबाबत आता लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

म्हणून फटका
या सर्वांचा फटका निवडणुकीच्या रिंगणातही बसणार याबद्दल भाजप नेत्यांमध्ये दुमत नाही. कोणी उघडपणे बोलत नसले तरी पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांचे निकाल हा त्याचा एक संकेत आहे. कोरोनानंतर मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये सार्वत्रिक नाराजी आहे हे उघड दिसून येत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष आहेत याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

त्यांना घरी बसवा
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपची परिस्थिती फारशी चांगली नसेल, असा फीडबॅक केंद्रीय नेतृत्वाला गेला आहे. सरकारमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे आणि त्यामुळेच काही मंत्र्यांना घरी बसवावे, असा मतप्रवाह वरिष्ठ पातळीवर आहे. नवीन चेहरे मंत्रिमंडळात यायला हवेत आणि मोदी यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यात कमी पडलेल्यांना घरी पाठवले पाहिजे, हे मत काही भाजप नेत्यांनी सर्वेसर्वा नेतृत्त्वापर्यंतही पोचविल्याची माहिती आहे.

मोदींच्या बाजूने युक्तिवाद नाही
सोशल मीडिया हे मोदी युगातील भाजपचे बलस्थान मानले जाते. एका अभ्यास पाहणीनुसार कोरोना महामारीच्या काळात केंद्रातील महत्त्वाच्या दहा मंत्र्यांनी केवळ मे महिन्यात १ हजार ११० ट्विट्स केली. गृहमंत्री अमित शहा यांनी या संपूर्ण काळात फक्त एक ट्विट कोरोना संदर्भात केले आहे. यात पीयूष गोयल, रमेश पोखरियाल निशंक आणि एस. जयशंकर यांच्यासारखे मंत्री वगळता एकाही मंत्र्याने पंतप्रधानांच्या बाजूने युक्तिवाद करणारी ट्विट केलेली दिसत नाहीत.


ट्विटचा लेखाजोखा
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर कोरोना काळात चौफेर टीका होत असताना ते आणि नितीन गडकरी यांनी मात्र अनुक्रमे २८७ आणि ११० ट्विट केली आणि त्यातील बहुतांशी ट्विटमध्ये कोरोना निर्मूलन उपाययोजनांचा उल्लेख आहे. गडकरी यांच्या बहुतेक सर्व ट्विटमध्ये सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्याची कळकळ असली तरी पंतप्रधानांचा गुणगौरव नाही. यासारख्या बाबी दिल्लीपर्यंत पोचल्या आहेत.
...........

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com