फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा कायदा-सुव्यवस्था सांभाळा : दरेकरांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर  - Maintain law and order instead of criticizing Fadnavis: Darekar's reply to Home Minister | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा कायदा-सुव्यवस्था सांभाळा : दरेकरांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

अब्दुल सत्तार यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी.

पुणे : महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्‍वर पांडे यांच्या प्रचाराला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस जाणार का? असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला होता. त्याला भाजपकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दरेकर यांनी गृहमंत्र्यांना दिला आहे. 

भाजप आणि भाजपप्रणित आघाडीला बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. देशमुख यांनी फडणवीस यांच्या या भूमिकेवरून "तुम्ही, गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करणार का?' असा प्रश्न विचारला आहे. तसेच, त्यांनी फडणवीस आणि पांडे यांच्यावर टीकाही केली आहे. त्याला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून गेल्या काही महिन्यापासून टीका-टिप्पणी सुरू आहे. सुशांतसिंहच्या मृत्यूबाबत एम्स रुग्णालयाने अजून कोणत्याही प्रकारचा अहवाल दिलेला नाही. असे असताना त्या संदर्भात प्रतिक्रिया देण्याची एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल दरेकर यांनी विचारला आहे. 

दरेकर म्हणाले की, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यातील त्यांची भाषा अत्यंत खालच्या पातळीवरील आहे. या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

विशिष्ट अकाउंटवरच कारवाई का? 

सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने फेक अकाउंट आहेत. मात्र, काही विशिष्ट अकाउंटवर सायबर विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. सायबर विभागामार्फत सर्वच फेक अकाउंटवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे दरेकर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख