सदाभाऊंचा खरा निशाणा होता तो संग्राम देशमुख आणि निशिकांत पाटील यांच्यावर - main target of Sadabhau khot was Sangram Deshmukh and Nishikant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

सदाभाऊंचा खरा निशाणा होता तो संग्राम देशमुख आणि निशिकांत पाटील यांच्यावर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

सदाभाऊंची समजूत अखेर चंद्रकांतदादांनी काढली...

पुणे : हो, नाही करत रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर विधान परिषद मतदासंघातून आपला उमेदवार मागे घेतला आहे. भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणी झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले.

खोत यांना भाजपने आमदारकी, मंत्रीपद दिल्यानंतरही त्यांनी बंडाचे निशाण का फडकावले, याचे अनेकांना कोडे पडले होेते. खोत यांचा राग हा देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नव्हता तर उमेदवार संग्राम देशमुख आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांच्याविरोधातील नाराजी खोत यांनी या निमित्ताने चंद्रकांतदादांच्या कानावर घातल्याचे समजते.

खोत यांना सांगली जिल्हा भाजपमध्ये योग्य वागणूक दिली जात नसल्याची तक्रार त्यांच्या समर्थकांनी केली. तसेच. सदाभाऊंचे पुत्र सागर खोत यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी संधी मिळाली होती. मात्र खोत विरोधकांनी ती लाभू दिली नाही. सागर यांना पद सोडावे लागले. नवा अध्यक्ष नेमताना सदाभाऊंना तोंडदेखले पण विचारले गेले नाही. कडकनाथ प्रकरण सदाभाऊंना चांगलेच झोंबले आणि त्यांच्या अंगाशी पण आले. पण या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील कधी बोलले नाहीत. काॅंग्रेसचे विश्वजित कदम यांनी चकार शब्द काढला नाही. सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीच हे प्रकरण लावून धरल्याचा सदाभाऊंचा पक्का समज झाला आहे. त्यामुळेच त्यांनी चंद्रकांतदादांच्या कानावर या गोष्टी घातल्या. 

निशिकांत पाटील यांना इस्लामपूरचा नगराध्यक्ष बनविण्यात खोत यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र निशिकांत आणि खोत या दोघांचेही नंतर जमेनासे झाले. सांगली भाजपमधील देशमुख-पाटील ही मंडळी एकत्र येऊन सामान्य मराठा कार्यकर्त्याला वर येऊ देत नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांपुढे मांडण्यात आल्याचे खोत समर्थकांनी सांगितले. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदे केले. त्यासाठी राज्यभर कोण फिरले, कोणी कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आवाज उठविला, याचा शोध पक्षाने घ्यावा आणि सांगलीतील भाजपचे नेते हे कसे पक्षाला अडचणीत आणत आहेत, याचा विचार करावा अशीही बाजू खोतांनी पाटील यांच्यापुढे मांडल्याचे कळते. खोत यांना चंद्रकांतदादांनी काय आश्वासन दिले, हे समजू शकले नाही. मात्र सांगली भाजपमधील दुफळी या निमित्ताने पुढे आली. खोत हे मनापासून देशमुख यांचे काम करणार का, याची या निमित्ताने उत्सुकता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख