महाभकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण नको होते : चंद्रकात पाटलांची टीका - mahavikas aghadi govt does not want maratha reservation alleges Patil | Politics Marathi News - Sarkarnama

महाभकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण नको होते : चंद्रकात पाटलांची टीका

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

भाजपला महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची आयती संधी

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिल्यानंतर त्याचे अपेक्षेप्रमाणे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार टीका केली असून या महाभकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण नको होते, अशा धारदार शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील टोला लगावला.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहासात आणि मराठा समाजाच्या आयुष्यात हा आजचा काळा दिवस आहे. राज्यात 32 टक्के मराठा समाज आहे. त्याच्यावर हा अन्याय आहे. आमच्या सरकारने रात्रीचा दिवस करून हे आरक्षण दिले. राज्य सरकारच्या आरक्षणावर उच्च न्यायालयाने  मोहोर उमटवली होती. मात्र महाविकास आघाडीच्या भकास कामगिरीमुळे स्थगिती मिळाली.

इतर राज्यांतही आरक्षणाची मर्यादी 50 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. मात्र कोणत्याही राज्यात स्थगिती नाही. मग महाराष्ट्रातच का?आता आंदोलन करूनही काही उपयोग नाही. या आरक्षणाच्या लढ्याची जबाबदारी असलेले मंत्री अशोक चव्हाण नेहमी ट्विट करत न्यायलयीन लढाईचे काम सुरू आहे, असे सांगत होते. प्रत्यक्षात काहीच तयारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महाभकास आघाडीला हे आरक्षण नको होते. हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने आणि मोठ्या नेत्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

कंगना राणावतच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांचा आदर करायला शिकवले. मात्र हे लांडग्यांसारखे कंगनाच्या मागे लागलेत, असा आरोप त्यांनी केला. महिलांचा अपमान आम्ही होऊ देणार नाही, असे सांगत या सरकारच्या प्रत्येक कृतीला न्यायालयात स्थगिती मिळते आहे. सुशांतसिंहचा तपास सीबीआयकडे देण्यास या सरकारने विरोध केला. न्यायालयाने त्यास मान्यता दिली. उच्च न्यायालयाने कंगनाच्या बांधकामावरील कारवाईला स्थगिती दिली. न्यायालयाने थप्पड मारल्याशिवाय या सरकारला जाग येत नाही. सगळ्यात आधी या सरकारने संजय राऊत यांचे सरकार म्हणून असलेले वागणे बंद केले पाहिजे. हरामखोर वगैरे असे शब्द महिलांबद्दल वापरणे योग्य नाही. नंतर नाॅटी म्हणून राऊत यांनी त्यावर सारवासारव केली. तुम्ही कधीपासून इंग्रजी बोलायला लागले, असा सवाल त्यांनी केला.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख