अनिल परबांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फायनल! - Mahavikas aghadi govt decides strategy to defend Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

अनिल परबांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फायनल!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

अनिल परब यांच्यावर कारवाई होणार, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे परब यांना वाचविण्यासाठी कोणत्या कायदेशीर बाबींचा वापर करता येईल, यावर विचारमंथन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करणार, याचा अंदाज  राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेला होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी भेट घेतली होती.

या  बैठकीत माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या चौकशी विषयी चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात महासंचालक अधिकारी संजय पांडे ही चौकशी करतआहेत. सचिन वाझे यांनी सीबीआयला दिलेल्या पत्रात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचेही  नाव समोर आल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता बोलली जात आहे. याविषयी या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

 सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर छापे मारल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतलीय. एकीकडे सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढत आहेत तर वाझे यांच्या पत्रातील अनिल परब यांचा उल्लेख आल्याने राज्य सरकार कडून माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची चौकशीही जलद गतीने करण्याची दडपड सुरू आहे. अनिल परब यांच्यावर कारवाई होणार, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे परब यांना वाचविण्यासाठी कोणत्या कायदेशीर बाबींचा वापर करता येईल, यावर विचारमंथन सुरू असल्याचे सांगण्यात आले. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी थेट छापासत्र सुरू केल्याने त्याचा वेगळाच संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे. परमवीरसिंह यांच्यावर कारवाई तातडीने करून जशास तसे उत्तर देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचे बोलण्यात येते.  तसेच सीबीआयच्या कारवाईच्या विरोधात आक्रमकपणे उत्तरे देण्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ही कारवाई कशी सुडाची आहे, या वातावरण निर्मितीचा प्रयत्न असणार आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या प्रकरणात आपल्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची मिडियासमोर बाजू मांडतांना कमी पडत आहेत. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत राष्ट्रवादी अनिल देशमुख यांच्या सोबत कायम राहील, असे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे आज सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने त्यावर बाजू मांडली आहे. 

जयंत पाटील काय म्हणाले?
अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली.  उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

वाझेंकडून गंभीर आरोप 
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा आरोप वाझे यांनी केला आहे.

परब यांचे प्रत्युत्तर 
अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असे काम करायला सांगितले नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटरबॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख