'या' महाराष्ट्र केसरीला व्हायचयं आमदार.. - Maharashtra Kesari wants to be MLA | Politics Marathi News - Sarkarnama

'या' महाराष्ट्र केसरीला व्हायचयं आमदार..

संपत मोरे
शुक्रवार, 31 जुलै 2020

शरद पवार यांची डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीत चंद्रहार पाटील यांनी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केल्याचे समजते.

पुणे : विधान परिषदेच्या बारा जागांपैकी एक जागा कुस्ती क्षेत्रातील पैलवानाला मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीत चंद्रहार पाटील यांनी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केल्याचे समजते. या भेटीत नेमके काय घडले याचा तपशील समजला नाही मात्र, त्यांची भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विधान परिषदेच्या जागेसाठी चंद्रहार पाटील भेटले तसेच ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनाही भेटल्याचे समजते. या भेटीदरम्यानही त्यांनी विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी केल्याचे वृत्त आहे. चंद्रहार पाटील हे सांगली जिल्ह्यातील भाळवणी गावचे रहिवासी आहेत. ते आळसंद जिल्हा परिषद गटातून सांगली जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. जिल्हा परिषदेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव दादा पाटील यांचा आळसंद जिल्हा परिषद गटातून धक्कादायक पराभव केला होता. 

या विजयानंतर चंद्रहार पाटील यांची सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होती. चंद्रहार यांनी औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे  झालेल्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनात महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. चंद्रहार  पाटील हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जातात. तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना आमदारकी मिळणार काय? याची चर्चा कुस्ती क्षेत्रात आहे.
 Edited  by : Mangesh Mahale 

 

हेही वाचा : योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही... 

लखनौ : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला सर्व धर्मीय लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसैनिकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्या रामजन्मभूमीचं भावनिक नातं आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या आणि शिवसेनेचे नातं पुढे टिकवून ठेवलं. मात्र, तरी देखील उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं नाही.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख