महाराष्ट्र काॅंग्रेसला धक्का : प्रभारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर ए. के. पाटील कोरोना पाॅझिटिव्ह - Maharashtra congress incharge h k patil corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र काॅंग्रेसला धक्का : प्रभारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर ए. के. पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

त्यांच्यासोबतच्या बैठकीला अनेक नेते उपस्थित होते. 

मुंबई : महाराष्ट्र काॅंग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दोन दिवसांपूर्वीच हाती घेतलेले एच. के. पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रदेश काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण त्यांच्या सूत्रे स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला, बैठकीला राज्यातील काॅंग्रेसचे जवळपास सर्वच मंत्री, नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, नसीम खान हे नेते अगदी जवळ बसले होते. त्यामुळे या सर्वांना काळजी घेण्याची सूचना पाटील यांनी केली आहे. पाटील हे गदग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मुंबई दौऱ्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आपल्याला कोणताही त्रास नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

राज्यातील अनेक नेत्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत. त्या आधी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली. 

राज्यात आतापर्यंत 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

राज्यात पहिला रुग्ण ९ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर २५ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा १ लाखाचा टप्पाही गाठला.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या २ लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये ३, ४ आणि ५ लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही ७,८,९ आणि आज १० लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख