एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास स्थानिक नेते अनुकूल - Local leaders favor Eknath Khadse to join NCP | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास स्थानिक नेते अनुकूल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार अरुण गुजराथी, डॉ. सतीश पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील उपस्थित होते. याबाबत रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. त्याच अनुषंगाने भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास पक्ष बळकटीसाठी त्यांचा फायदा होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असली तरी खडसे यांनी मात्र आपण याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे.  खडसे यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये खर्ची घातले आहे. महाराष्ट्रात दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी राज्य पिंजून काढले होते. शिक्षणमंत्री, महसूल मंत्री, विरोधीपक्षनेते आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.

मात्र, 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांना असे वाटत होते की आपला मुख्यमंत्रीपदासाठी विचार होईल पण, तसे काही झाले नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवसापासून ते नाराज होते. नाराज असले तरी ते फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री बनले. त्यांना अनेक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही देण्यात आली होती. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. 

सत्तेत असूनही फडणवीस आणि खडसे यांचे म्हणावे तसे जमले नाही. पुढे भोसरी जमीनप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2019 च्या निवडणुकीत त्यांचे तिकीटही कापण्यात आले. त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले मात्र मुलीचाही पराभव झाल्याने या नाराजीत भरच पडली.

या ना त्या कारणाने खडसे हे फडणवीसांना लक्ष्य करीत आले. काही दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली. त्यांच्या टीकेला फडणविसांनीही उत्तर दिले. आता ते स्वत:वर झालेल्या अन्यायाबाबत पुस्तक लिहिणार आहेत तसे त्यांनीच जाहीर केले आहे. 

गेल्या काही दिवसापासून नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनी सामशी बोलताना खुलासा केला आहे. ते म्हणाले,की अजून मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांबरोबर चर्चा केलेली नाही. याबाबत मी अजून कोणताही विचार केला नाही. 
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख