this is the list what you can do or not do in fourth corona lock down | Sarkarnama

नव्या लाॅकडाऊनमध्ये तुम्ही काय करू शकणार? काय नाही? याची ही यादी!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 मे 2020

कृषी तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरू करणे करणे, काही क्षेत्रांमध्ये राज्य सरकारांना निर्णय आधिकार देणे आणि सार्वजनिक वाहतुकीसह गर्दी जमा होणाऱ्या सभा-समारंभांवर बंदी कायम, या ठळक त्रिसूत्रीवर लॉकडाउन ४.० आधारित आहे.

नवी दिल्ली  : कोरोनाच्या जागतिक साथीशी लढण्यासाठी ५४ दिवस लागू करण्यात आलेले लॉकडाउन येत्या ३१ मे पर्यंत वाढविण्याची अपेक्षित घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी केली. गृह मंत्रालयाने याबाबतचे दिशानिर्देश जारी केले. मात्र या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, दो गज की दूरी, आरोग्य सेतू डाउनलोड करण्याची सक्ती, हे नियम कायम ठेवण्यात येणार आहेत.

कृषी तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरू करणे करणे, काही क्षेत्रांमध्ये राज्य सरकारांना निर्णय आधिकार देणे आणि सार्वजनिक वाहतुकीसह गर्दी जमा होणाऱ्या सभा-समारंभांवर बंदी कायम, या ठळक त्रिसूत्रीवर लॉकडाउन ४.० आधारित आहे.
मे महिना सुरू झाल्यापासून कोरोनचा संसर्ग वाढत असून मागच्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक ४९८७ नवीन रुग्ण आणि १२० जणांचा मृत्यू, हा कल पाहता लाॅकडाउन उठवणे पातळीवर अशक्य दिसत होते तोच निर्णय सरकारने घेतला आहे.

हे बंदच राहणार
- शाळा, महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संस्था
- मेट्रो व रेल्वे सेवा
- देशांतर्गत विमान वाहतूक
- शॉपिंग मॉल
- धार्मिक स्थळे
- सार्वजनिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम

- कंटेनमेंट झोनमध्ये बस सेवा
- सार्वजनिक ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू सेवनावर बंदी
- चित्रपटगृहे, जिम्नॅशियम, पोहण्याचे तलाव, एन्टरटेन्मेंट पार्क, असेंब्ली हॉल, कार्यालये,
-----------------
यांना परवानगी
- रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरविण्याचा अधिकार राज्यांना
- स्टेडियम आणि क्रीडा संकुले उघडता येतील, मात्र प्रेक्षकांना परवानगी नाही
- आरोग्य सेवक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतील
- कंटेन्मेंट झोनच्या बाहेर आंतरराज्य बस वाहतुकीसाठी दोन्ही राज्यांची सहमती अत्यावश्यक.

- ----------
हे बंधनकारक
- ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील मुलांनी घरातच राहणे बंधनकारक
- सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी कायम
- लग्न समारंभात ५० जणांहून अधिक जणांना परवानगी नाही
- अंत्यसंस्कारावेळी २० पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही
- कोरोना संबंधीची सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक

कंटेनमेंट झोनमध्ये
- केवळ अत्यावशक सेवांना परवानगी
- नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध कायम
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येणार
- घराघरांत तपासणी, संसर्ग झालेल्या व्यक्तींशी संबंधित कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक गतीने

 

नव्या रंगरूपातील कोरोना लॉकडाउन ४.० मध्ये दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह देशाच्या बारा राज्यांमधील मुंबईसह ३० शहरे आणि महानगरांच्या क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनचा नियमांमधून कोणतीही सूट मिळणार नाही, असे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रातील सर्वाधिक सात जिल्हे आहेत.

ज्या शहरांमध्ये लॉकडाउन नियम पूर्वीप्रमाणेच जारी राहणार आहेत, त्यांच्याच हद्दीमध्ये देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ८० टक्के कोरोनाग्रस्त असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यातच लॉकडाउन-४ लागू होणार असे स्पष्ट केले होते. या काळात जेथे कोरोनाचा फारसा उद्रेक नाही, तेथील कृषी आणि आर्थिक व्यवहार तसेच उद्योग पूर्वपदावर करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र बारा राज्यांमधील या ३० शहरांमध्ये महानगरांमध्ये मात्र सोशल डिस्टन्सिंगसह सारे नियम यापुढेही अमलात येणार आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगाण, आंध्र प्रदेश, पंजाब तसेच ओडिशा या राज्यांचा यात समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७, तमिळनाडूतील ६ गुजरात आणि राजस्थानातील प्रत्येकी ३, बंगालमधील २, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, आदी सहा राज्यांनी लॉकडाउन या महिनाअखेरपर्यंत वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १२ राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्स केली. या मोठ्या शहरांमधील परिस्थिती अशी आहे की लॉकडाउन ४ मध्येही तेथील कोरोना परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निरीक्षण आहे. यांमध्ये सामाजिक उद्रेकाची भीती सर्वाधिक आहे.
- - - - - - -
यांना मिळणार नाही सूट :

राजधानी दिल्ली
महाराष्ट्र : बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, सोलापुर, नाशिक, औरंगाबाद, पालघर
तमिळनाडू : चेन्नई, तिरुवल्लूर, कुड्डालोर, चेंगलपट्टू, अरियालुर, विल्लुपुरम
गुजरात : अहमदाबाद, सूरत, बडोदा
राजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूर
पश्चिम बंगाल : कोलकाता, हावड़ा
मध्य प्रदेश : इंदूर, भोपाळ
उत्तर प्रदेश : आग्रा, मेरठ
तेलंगण : हैदराबाद
आंध्र प्रदेश : कुर्नूल
पंजाब : अमृतसर
ओडिशा : बेरहमपुर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख