नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली..भातखळकरांचा शिवसेनेच्या माजी आमदारांना टोला.. - Leaders sell shame for power Bhatkhalkar scolds former Shiv Sena MLA | Politics Marathi News - Sarkarnama

नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली..भातखळकरांचा शिवसेनेच्या माजी आमदारांना टोला..

मुझफ्फर खान
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून शिवसेना आणि माजी आमदार भास्कर जाधव यांना टोला लगावला. भातखळकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

चिपळूण : ''नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ?'' असे म्हणत भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून शिवसेना आणि माजी आमदार भास्कर जाधव यांना टोला लगावला. भातखळकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

"लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले ? पोलीसही हप्ते घेतातच ना," असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसापूर्वी गुहागर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात केले होते. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्याने कारवाई केली होती. 

त्याचा संदर्भ देत आमदार जाधव म्हणाले होते कि लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर बिघडले कुठे. पोलिस हप्ते घेतातच ना. कार्यकर्त्यांची पाठराखण करण्यासाठी जाधवांनी हे विधान केले. मात्र, सोशल मिडीयावर त्याची वेगळीच चर्चा सुरू झाली. अवैध दारू विक्रीला भास्कर जाधवांचे समर्थन आहे का ? अशीही चर्चा सुरू असताना भाजपने भास्कर जाधवांच्या या विधानाला गांभीर्याने घेतले पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावला. नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ? असे भातखळकर यांनी ट्विट केल्यानंतर त्याचीही चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा : बिहारच्या विकासासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची मदत घ्या.. 

मुंबई : वर्षभरापूर्वीचे ते दुःख विसरण्यासाठी भाजपचे नेते बिहारमध्ये गेले.  महाराष्ट्रात जो शब्द पळाला नाही तो बिहारात पाळला, असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला हाणला आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्याचं बिहारमध्ये कौतुक होत असल्याचा आनंद आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. बिहारमध्ये ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल. नितीशकुमारांना आमच्या शुभेच्छा, अशा खोचक शब्दांत शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख