महाविकास आघाडी पन्नास टक्केही मतं राखू शकली नाहीत..दरेकरांची टीका... - Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar criticizes the Mahavikas Aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडी पन्नास टक्केही मतं राखू शकली नाहीत..दरेकरांची टीका...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

पुणे : विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत महाविकास आघाडीची सरासरी २०० मते फुटली आहेत. त्यामुळे या निवडणुकीने आघाडीतील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. प्रविण दरेकर यांनी याबाबत टि्वट केलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये प्रविण दरेकर म्हणतात, "धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्के ही मतं राखू शकली नाहीत यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे काय भविष्य राहील हे स्पष्ट होतय." 

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची पोटनिवडणूक एक डिसेंबरला झाली. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी आठपासून मतमोजणीस सुरवात झाली. त्यात भाजपचे नेते उमेदवार अमरिशभाई पटेल यांना ३३२, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. चार मते बाद झाली. अनुभवी अमरिशभाईंनी नवखे उमेदवार पाटील यांना अक्षरशः धुळ चारली.

धुळे- नंदुरबार मतदारसंघात भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, असे मिळून महाविकास आघाडीचे २१३, एमआयएमचे ९, समाजवादी पार्टीचे ४, बसप १, मनसे १, अपक्ष १० मतदार आहेत. महाविकास आघाडी कागदावर संख्याबळाने स्ट्रॉंग दिसत असली तरी त्याचा निकालावर प्रभाव दिसून आला नाही. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे भगदाड पाडले. ऐन विधानसभा निवडणुकीवेळी अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सदस्य आणि विधान परिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. 

या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. यात अमरीशभाई भाजपमध्ये आले तरी त्यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीमधील समर्थक सदस्यांनी व इतर पक्षीय  सदस्यांनी या निवडणुकीत आपल्या नेत्याप्रती मतदानातून निष्ठा प्रकट केली. त्यामुळे अमरीशभाईंचा विजय सुकर झाला. महाविकास आघाडीच्या पाठीशी धुळे - नंदुरबार मतदारसंघातील केवळ 98 सदस्य असल्याचे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख