कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण  - Labor Minister Dilip Walse Patil infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

दिलीप वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात हजर होते.

मुंबई : राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती वळसे पाटील यांनी ट्‌विट करून स्वतः दिली आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) त्यांचा वाढदिवस आहे. 

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळातील दहा ते बारा मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. 

दिलीप वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात हजर होते. कॅबिनेट बैठक सुरू होण्याआधी त्यांना कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले. 

ट्‌विटमध्ये वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. माझी प्रकृती उत्तम असून मला कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

त्यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, धन्यवाद. 

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

परंतु यातील अजित पवार हे रुग्णालयात उपचार घेत असून इतर सर्व मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे सर्व मंत्री सध्या राज्याच्या मंत्रिमडळात काम करीत आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख