'या' कारखान्यांतील दोन भावांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असायचे अन् आताही तेवढीच चुरस ! - Krishna Sugar Factory election Inderjit Mohite Avinash Mohite suresh bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

'या' कारखान्यांतील दोन भावांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असायचे अन् आताही तेवढीच चुरस !

अमोल जाधव
बुधवार, 31 मार्च 2021

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आतापर्यंत सहा निवडणुका झाल्या आहेत.

कराड (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगांव व खानापूर अशा तीन तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या आणि सुमारे 50 हजारच्या दरम्यान सभासद असलेल्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आतापर्यंत सहा निवडणूका झाल्या आहेत. या कारखान्याने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय रंग नसले तरी या दोन्ही जिल्ह्यातील प्रभावी राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर बरीच समीकरणे अवलंबून असतात. 

कारखाना उभारणीत अनेक अडथळे

यशवंतराव मोहिते 1952 मध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्या काळात कृष्णा नदीवरील सिंचित असलेल्या शेतीत ऊसाचे पीक घेतले जायचे. ऊसापासून निर्माण होणाऱ्या गुळास तुटपुंजा दर मिळत असल्याने त्या समस्येवर मात करण्यासाठी यशवंतराव मोहितेंनी 1953 च्या दरम्यान रेठरे बुद्रुक व किल्ले मछिंद्रगडच्या मध्यभागी माळरानावर कृष्णा कारखाना उभारणीचा प्रस्ताव दिला. कारखाना उभारणीच्या अर्जास मंजुरी घेताना अनेक अडथळे पार करावे लागले. कारखान्याचा अर्ज मंजूर करताना यशवंतराव चव्हाण यांनी मोहितेंना काँग्रेसमध्ये येण्याची अट घातली. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातून अनेक मातब्बरांसोबत मोहितेही काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर कारखाना मंजूर झाला.

तात्या तडसरकरांकडून दीड लाख रुपये

भागभांडवल गोळा करण्यासाठी यशवंतराव मोहिते, निळकंठराव कल्याणी, आबासाहेब मोहिते, रंगराव पाटील, धोंडजी पाटील, यशवंतराव उर्फ तात्या मोहिते यांच्यासह सहकाऱ्यांनी जीवाचे रान केले. भागभांडवलाची रक्कम अपुरी पडत असताना तडसर (जि. सांगली) येथील त्या काळातील प्रसिद्ध व्यापारी तात्या रावजी पवार (तात्या तडसरकर) यांनी दीड लाख रुपये दिले. याद्वारे शेअर्स हिस्सा पूर्ण झाल्यानंतर 1958 मध्ये प्रत्यक्ष कारखाना उभारणीस सुरवात झाली. कारखान्याच्या संस्थापक प्रवर्तक मंडळाचे यशवंतराव मोहिते पहिले अध्यक्ष होते. 

रयत संघर्ष मंचची घोषणा

1962 ला पहिला गळीत हंगाम सुरू झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मोहिते उपमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले धाकटे बंधू जयवंतराव भोसले यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर 1989 पर्यंत जयवंतराव भोसले कारखान्याचे अध्यक्ष राहिले. 1987 मध्ये या विभागात कृष्णा ट्रस्ट व अन्यायी पाणीपट्टी विरोधात यशवंतराव मोहिते यांनी मोठा संघर्ष पेटवला. रयत संघर्ष मंचची त्यांनी वाठार येथील माळावरील सभेत घोषणा केली. त्यांच्या लढ्यास यश मिळाले.

1989 मध्ये तीस वर्षांनंतर पहिल्यांदा सत्ताबदल झाला आणि प्रदिर्घ काळ कारखान्याचे अध्यक्ष राहिलेल्या (कै.) जयवंतराव भोसले यांना सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. सत्तांतरानंतर (कै.) मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर 1995 ची निवडणूक मोहितेंचे रयत पॅनेल विरुध्द भोसलेंच्या सहकार पॅनेलमध्ये झाली. त्या निवडणुकीत पाच वर्षातील मोहिते यांच्या चांगल्या कारभारास सभासदांनी पाठिंबा दिला. त्यानंतरही मदनराव मोहितेच पुन्हा अध्यक्ष बनले. 

ऐतिहासिक सत्तांतर

1999 मध्ये पुन्हा दुसरे सत्तांतर झाले. तर 1999 च्या निवडणूकीत भोसलेंच्या सहकार पॅनेलला सभासदांनी पसंती दिली. भोसलेंचे सुपूत्र डॉ. सुरेश भोसले कारखान्याच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांच्या कारकिर्दीस 2005 मध्ये रयत पॅनेलने धक्का देत सत्तांतर केले. त्यानंतर (कै.) यशवंतराव मोहिते यांचे सुपूत्र डॉ. इंद्रजित मोहिते अध्यक्ष बनले. तीन निवडणूकांत सातारा व सांगली जिल्ह्यातील नेत्यांच्या भूमिका निर्णायक ठरल्या. डॉ. मोहिते यांची कारकिर्द सुरु असताना पारंपारिक हाडवैर असलेल्या मोहिते व भोसले गटाचे 2007 मध्ये ऐतिहासिक मनोमिलन झाले. या मनोमिलनचा फायद्याऐवजी तोट्यातच भर पडली. कार्यकर्त्यांची नाराजी हाताशी घेऊन कारखान्याचे संस्थापक संचालक राहिलेल्या (कै.) आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते या नवख्या चेहऱ्याने मनोमिलन गटाचा दारुण पराभव करत 2010 मध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडवले. 

सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी  व्युव्हरचना

अविनाश मोहिते यांच्या कारभारास पाच वर्ष पूर्ण होताच 2015 मध्ये रयत, सहकार विरोधात संस्थापक पॅनेलमध्ये तिरंगी लढत झाली. त्यात भोसले गटाने माजी मंत्री (कै) विलासराव पाटील- उंडाळकर गटाच्या सहकार्याने बाजी मारत भोसले गटाची कारखान्यात सत्ता आली. सध्या कारखान्याच्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. (कै.) जयवंतराव भोसले गटाचे डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेल रिंगणात उतरणार आहे. तर डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठीची व्युव्हरचना आखली आहे.  
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख