कोल्हापूरचे कारखानदार जे ठरवतात, तसे वागत नाहीत : जयंत पाटील  - Kolhapur's sugar mills do not act as they decide : Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरचे कारखानदार जे ठरवतात, तसे वागत नाहीत : जयंत पाटील 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

वारणेच्या डाव्या कालव्याचे आडव्या पाटाने वाळवा तालुक्‍यास पाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आराखडा तयार आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने ऊसदराबाबत जे ठरवतात, तसे वागत नाहीत, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकत्र बसून जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असे आवाहन जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज (ता. 7 नोव्हेंबर) साखराळे येथील जाहीर सभेत केले. 

देशातील अतिरिक्त साखर उत्पादनाच्या समस्येवर राजारामबापू कारखान्याने इथेनॉल निर्मितीचा पर्याय पुढे आणल्याचे त्यांनी सांगितले. राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल शाखा व कारंदवाडी युनिटमध्ये मंत्री पाटील यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून गाळप हंगामास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष श्‍यामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, सभापती शुभांगी पाटील प्रमुख उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले,"देशात 250 लाख क्विंटल साखरेचा खप असताना उत्पादन 310 लाख क्विंटल होत आहे. 60 लाख क्विंटल अतिरिक्त उत्पादन होत असून गेल्या वर्षाची 110 लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. साखर निर्यातीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आपण वाटेगावसह साखराळे युनिटमध्ये इथेनॉलनिर्मितीवर भर द्यायला हवा. शेती विभागाचे कर्मचारी शेतात येऊन उसाच्या नोंदी घेत असून शेतकऱ्यांना वर्षांत 5-6 भेटी देवून मार्गदर्शन करणार आहेत. या वर्षात शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन करण्यास प्रोत्साहन देणार आहोत. 

पी. आर. पाटील म्हणाले,"आम्ही ऊसतोडणी मजुरांच्या तपासण्या करून त्यांना मास्क, सॅनिटायझर मोफत देणार आहोत. कोरोना बाधितांसाठी कोरोना सेंटर उभारणार आहोत. केंद्र सरकारने "एफआरपी'मध्ये वाढ केली. मात्र, साखरेचे दर वाढविले नाहीत. 2018-19 ची एफआरपी देण्यास काढलेल्या बॅंक व्याजाच्या 50 टक्के रक्कम दिलेली नाही.

साखर निर्यात अनुदान 73 कोटी 92 लाख व बफरस्टॉक व्याजाचे 11 कोटी 79 लाख रुपये अद्याप दिले नसल्याने आपला तिसरा हप्ता देण्यास विलंब झाला. आपण 200 रुपये दिले असून उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी निश्‍चितपणे देवू. आपण जतसह चार युनिटमध्ये 25 लाख टन उसाचे गाळप करणार आहोत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सर्वांनी सहकार्य करावे.'' 

संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्षा छाया पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली उपस्थित होते. उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले. 

वाळवा तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न सुटणार 

वारणेच्या डाव्या कालव्याचे आडव्या पाटाने वाळवा तालुक्‍यास पाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आराखडा तयार आहे. दोनेक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप येईल. यामुळे तालुक्‍याचा 100 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. येत्या 10-20 वर्षांत पाण्यावरून वाद निर्माण होऊ शकतात, त्यापूर्वीच आपल्या हक्काचे पाणी तालुक्‍यास मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख