कोल्हापुरात ठाकरे-फडणवीसांच्या भेटीत काय ठरले? 

तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी होती. ती अद्यापही आलेली नाही.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray .jpg
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray .jpg

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांची भेट घेतली. या परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करा, अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली. तसेच या पूरपरिस्थितीवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी एक बैठक बोलवा असेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुंबईत गेल्यावर बैठक बोलावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (In Kolhapur, Chief Minister Uddhav Thackeray and Devendra Fadnavis met) 

देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले ''आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावे की मदत म्हणावे हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे'' असे फडणवीस यांनी सांगतिले. 

आज या पुराच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९च्या पुराचा अभ्यास करून एक प्रस्ताव आम्ही जागतिक बँकेला पाठवला होता. इथले पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी, आम्ही केंद्रीय विभागाची देखील मदत घेतली होती. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येते. २५ नोव्हेंबरला आम्ही ३५०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. जागतिक बँकेनेही त्याला तत्वत: मान्यता दिली होती. तो प्रस्ताव पुढे नेण्याची गरज आहे. 

आज सकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण एक बैठक बोलवा, त्यावर मुख्यमंत्री आम्हाला बोलावणार आहेत. त्यावेळी आम्ही सूचना मांडूच. मात्र, पुरावर हाच दीर्घकालीन उपाय आहे. बॅकवॉटरमुळे लोकांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यावर काम करण्याची विनंती आम्ही सरकारला करणार आहे. त्यासोबतच तात्काळ मदत करणे गरजेचे आहे, अशी मागणी आम्ही करतो, असे फडणवीस म्हणाले. 

तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी होती. ती अद्यापही आलेली नाही. सातत्याने नागरिक २०१९च्या मदतीचा उल्लेख करत होते. तेव्हा रोखीने तात्काळ मदत करण्यात देण्यात आली होती. आपत्ती आल्यानंतर त्यानंतरचा महत्त्वाचा काळ असतो, ज्यात तातडीची कामे करावी लागतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये चिखल घुसतो, सर्व वस्तू ओल्या झाल्या असतात. सर्व गोष्टी लोकांना आणाव्या लागतात. त्यामुळे तातडीची मदत आवश्यक असते. त्या कुटुंबाकडे तेवढेही पैसे नसतात. सरकारने अद्याप ती मदत दिलेली नाही. आता तरी सरकारने ती मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे, अशी मागणी फडणवीसांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com