मेट्रोला पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार : सोमय्या  - Kirit Somaiya criticizes Mahavikasaghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

मेट्रोला पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार : सोमय्या 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

मुंबई :  मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केली असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 5000 कोटी रुपयांनी वाढेल, हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. याबाबत सोमय्या यांनी टि्वटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. 
 
विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून भाजप सरकारच्या काळात आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. 

सोमय्या म्हणाले की कांजूरमध्ये मेट्रो कारशेड गेल्यामुळे आता मेट्रो ट्रेनच्या पार्किंगसाठी रोज आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठीच्या खर्चातही वाढ होईल. सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे ? मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीवर ? या जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. 

गोरेगाव येथील आरेची जागा मेट्रोच्या कारशेडसाठी देण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली होती. त्याला पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. शिवसेना व सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या आंदोलनात उतरले होते. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली. 

ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी ही माहिती दिली. आरेमध्ये सहाशे एकरचे जंगल घोषित केले आहे. शहरांची जंगले होतात पण शहरात जंगल असणे ही गोष्ट मोठी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, '' आरे कार शेडचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही विरोध केला. अनेक पर्यावरणवादी ज्यांचे जीवसृष्टीवर प्रेम आहे. रातोरात झाडे कापली गेली. सत्याग्रहींवर गुन्हे दाखल झाले. त्यांचे सर्व गुन्हे सरकार मागे घेते आहे. आरेमध्ये जवळपास सहाशे एकरची जागा जंगल घोषीत केले आहे. तेथील आदिवासी पाडे, तबेले कुणाच्याही अधिकारांवर गदा येऊ न देता घोषीत केले. या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे,'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख