खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर पॉझिटिव्ह  - Khanapur Assembly constituency MLA Anil Babar positive | Politics Marathi News - Sarkarnama

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर पॉझिटिव्ह 

संपत मोरे
रविवार, 6 सप्टेंबर 2020

आमदार बाबर यांच्यासोबत त्यांचे स्वीय्य सहाय्यक आणि चालक यांची चाचणी घेतली त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पुणे : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचे स्वीय्य सहाय्यक आणि चालक यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाल्यानंतर आमदार बाबर सातत्याने लोकांना मदत करून आधार देत आहेत. सुरुवातीच्या काळात खानापूर आणि आटपाडी या तालुक्यातील शेकडो गलाई बांधव परराज्यात होते. त्यांना आपल्या घरी आणणे हे आव्हान आमदार बाबर यांच्यापुढे होते. परराज्यातुन महाराष्ट्रात यायला अनेक अडथळे होते. केंद्र सरकारच्या काही कडक अटी होत्या, या काळातसुद्धा गलाई बांधवाना आधार देण्याचे काम आमदार बाबर यांनी केले.

कोरोनाच्या काळात आमदार बाबर यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत लोकांच्या भेटी घेत होते. राज्य सरकारला अनेक गोष्टी त्यांनी कळवल्या. कोरोनाच्या काळात काम करत असताना ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणीबद्दल त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे आपली निरीक्षणे नोंदवली. लोकांच्या अडचणी मार्गी लावल्या. आमदार बाबर यांच्यासोबत त्यांचे स्वीय्य सहाय्यक आणि चालक यांची चाचणी घेतली त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आमदार बाबर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

सांगली जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना राजकीय क्षेत्रातील मान्यवरही कोरोनाने बेजार झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल सात आमदारांना कोरोनाची बाधा झाली असून माजी खासदार, माजी आमदार आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना कोरोनाने झटका दिला आहे.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगाव चे आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  

यापैकी सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम हे कोरोना मुक्त होऊन पुन्हा एकदा कामाला लागले असून अन्य आमदारांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.  आमदार खाडे आणि गाडगीळ हे सध्या घरी थांबून उपचार घेत आहेत. सदाभाऊ खोत कोरोनामुक्त होऊन आंदोलनात उतरले आहेत. आमदार सुमनताई पाटील यांच्या घरातील अन्य मुलासह  अन्य सदस्यही पॉझिटिव्ह आहेत. पालकमंत्री जयंत पाटील कृषी राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम हे दोघे सुरक्षित आहेत.मात्र या सर्व आमदारांसोबत बैठकांना एकत्र असतातच त्यामुळे जिल्ह्यातील  नेत्यांची काळजी आता वाढली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, संभाजी पवार,  काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.  सांगलीचे माजी महापौर हरून शिकलगार यांचा तर कोरोनाने धक्कादायक मृत्यू झाला. हे सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी गेल्या पाच सहा महिन्यापासून कोरोना विरुद्धच्या लढाईत मैदानात उतरून काम करत आहेत.  कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याचे महाकाय आव्हान सांगली जिल्ह्यात समोर उभे आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख