खडसेंकडे कोणा भाजप नेत्याची `सीडी`? :`सीडी` प्रकरणाने जळगावात अनेकांच्या राजकारणाला `काडी` - khadse claim of CD raises eye brows of many bjp leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

खडसेंकडे कोणा भाजप नेत्याची `सीडी`? :`सीडी` प्रकरणाने जळगावात अनेकांच्या राजकारणाला `काडी`

कैलास शिंदे
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

खडसेंचा भाजपला जाहीर इशारा... 

जळगाव : त्यांनी माझ्या पाठीमागे इडी (अंमलबजावणी संचालनालाय) लावले तर मी त्यांना सीडी लावेल, असे विधान एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या वेळी बोलताना केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

खडसे यांच्याकडे कोणती सीडी आहे? त्यात नेमके काय आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. सीडी लावली तर काय होते हे, जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच माहीत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना भारतीय जनता पक्षाचे जळगाव मतदारसंघाचे खासदार यांची सीडी (क्लिप)मोबाईलवर लागली आणि खानदेशात खळबळ उडाली. तब्बल दोन वेळा निवडून आलेले खासदार ए.टी पाटील यांची तिसऱ्यांदा निश्चित झालेली उमेदवारी पक्षाने त्यामुळे रद्द केली.

भाजपच्या अंतर्गत वादातून ही सीडी लावण्यात आली असल्याची चर्चा आहे. तिची चर्चा अनेक दिवस खानदेशात सुरू होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर ती मोबाईलवर व्हायरल करण्यात आल्याने खासदारांना आपली उमेदवारी गमवावी लागली. त्यामुळे `सीडी लावण्या`चा वाक्प्रचार  खानदेशातील राजकारणात रूढ झाला.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्याही सीडी प्रकरणाची चर्चा सुरू आहे. एकेकाळचे महाजन यांचे निकटचे सहकारी प्रफुल्ल लोढा यांनी पक्ष सोडून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी आपल्याकडे गिरीश महाजन यांची सीडी असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्या सीडीला गिरीश महाजन यांनीही आव्हान दिले आहे. आता खडसे यांच्या दाव्यानंतर जळगावच्या राजकारणात या सीडीचीही जोरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे खडसे कोणाचा भांडाफोड करणार, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. 

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

भाजपला रामराम केलेल्या एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. आयुष्यातील 40 वर्षे ज्या पक्षासाठी घातली त्यानेच मला अडगळीत टाकले, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. माझ्या मागे 'ईडी' लावाल तर तुमच्या मागे 'सीडी' लावेल, असा इशाराही त्यांनी आज दिला. 

खडसे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या प्रवेशासाठी खडसे कालच पत्नी, मुलगीसोबत मुंबईत दाखल झाले होते. खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी भाजप सोडलेला नाही. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. मात्र, कन्या रोहिणी या भाजप सोडणार असून त्या आता राष्ट्रवादीचे काम करणार आहेत. 

या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, आयुष्यातील 40 वर्षे भाजपच्या उभारणीपासून आतापर्यंत मी काम केले. विधानसभेत माझी बदनामी आणि छळवणूक झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. माझा गुन्हा काय, माझ्याविरोधात नेमके काय आहे, याचे उत्तर मला आजपर्यंत मिळालेले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष करणे हा माझा स्थायी स्वभाव आहे. भाजपच्या सुरूवातीपासून मी काम केले. समोरासमोर लढलो पण पाठीत खंजीर कधी खुपसला नाही. असा प्रयोग मी कधीच केला नाही. 

मी जयंतरावांशी पक्ष प्रवेशाबाबत बोललो त्यावेळी, ते म्हणाले की तुमच्या मागे ईडी (सक्त वसुली संचालनालय) लावतील. त्यावर मी म्हणाले होतो की, ते ईडी लावतील तर मी सीडी लावेल. तुम्हालाही माहिती हा काय प्रकार आहे. भाजपने मला अडगळीत टाकले होते. यापुढे संधीही मिळण्याची शक्यता नव्हती. मी न मागता भाजपने रोहिणी ताईंसाठी तिकिट दिले. ऐनवेळी तिकिट देण्यात आले होते. 

गेल्या बुधवारी खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दोन ओळीत राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला केला होता. केवळ आणि केवळ फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला. त्यांनी आपल्याला त्रास दिला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता. 

जवळजवळ चार दशके भाजपमध्ये घालविलेल्या खडसे यांच्यासारख्या नेत्याला पक्षाला सांभाळून ठेवता आले नाही. राज्यात 2014 मध्ये जेव्हा भाजपचे सरकार आले, त्यावेळी खडसेंना वाटले की आपणास मुख्यमंत्री केले जाईल. पण, तसे काही झाले नाही. फडणवीस मुख्यमंत्री बनले. त्या दिवसापासून या दोन्ही नेत्यांमध्ये खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरवात झाली. खडसे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही होते. पुढे त्यांना भोसरी जमीन गैरव्यवहारात राजीनामा द्यावा लागला. गेली चार वर्षे ते भाजपत होते. या वर्षात त्यांनी फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. 

खडसे यांनी अधिकृतरीत्या आता भाजप सोडल्यानंतर ते अधिकच आक्रमक झालेले दिसून येत आहे. फडणवीस यांच्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येऊ शकली नाही. आमच्या सारख्या नेत्यांची तिकीट कापली त्यामुळे पक्षाला कमी जागा मिळाल्या, असा हल्लाबोल खडसे यांनी केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख