कोणा मंत्र्याची खळबळजनक क्लिप नाथाभाऊंकडे? विविध नावांवर अंदाज... - Khadase have sensational clip of one minister but refuses to disclose name | Politics Marathi News - Sarkarnama

कोणा मंत्र्याची खळबळजनक क्लिप नाथाभाऊंकडे? विविध नावांवर अंदाज...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने असा दावा केल्यामुळे संभाव्य नावाविषयी चर्चा होणे स्वाभाविक आहे...

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकेचे प्रहार करताना जाता जाता दुसरी पण खळबळजनक ब्रेकिंग न्यूज देऊन टाकली. पण या बातमीबाबत एकच वाक्य बोलले आणि सगळचं आता सांगू का, असे म्हणत पत्रकारांना या विषयी अधिक न विचारण्याचा सल्ला दिला.

वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी मुक्ताईनगर येथे बोलताना जुन्या भळभळत्या जखमा पुन्हा उघड्या केल्या. आपल्यावर अन्याय कसा झाला? मंत्रिपद कसे गेले आणि त्या मागे कोण होते, हे सविस्तरपणे सांगितले. याबाबतच्या साऱ्या गोष्टी आगामी आत्मचरित्रात पुराव्यानिशी लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सारे सांगताना `एका मंत्र्याच्या पीएची महिलेसोबतची अश्‍लील क्लीप माझ्याकडे आहे. तो मंत्री व पीए कशा पद्धतीने काम करतात, याची वरिष्ठांना माहिती दिली आहे. मात्र, कारवाई झालेली नाही,` असेही खडसेंनी स्पष्ट केले. आता हा मंत्री कोण? केंद्रातील की राज्यातील? विद्यमान सरकारमधील की फडणवीस सरकारमधील, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. उत्तर महाराष्ट्रातील की पश्चिम महाराष्ट्रातील, भाजपचा, शिवसेनेचा की दोन्ही काॅंग्रेसमधील, असे अनेक उपप्रश्नही तयार होते. मात्र खडसेंनी या व्यतिरिक्त अधिक काही सांगण्यास नकार देऊन तो मुद्दा तसाच चर्चेत राहील, याची व्यवस्था केली.

त्या मंत्र्यांविषयी वरिष्ठांना माहिती दिली, असे वाक्य त्यांनी उच्चारले यावरून तो भाजपमधील असावा असा अंदाज बांधला जात आहे. कारण इतर पक्षांतील नेत्यांना खडसेंनी `वरिष्ठ` म्हणण्याचे कारण नाही. पण सध्या राज्यात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे तो आधीच्या सरकारमधील आहे की काय, अशीही शंका येते. मात्र त्यांनी माजी मंत्री असाही त्यासाठी स्पेसिफिक शब्द वापरलेला नाही. त्यामुळे जळगावच्या जिल्ह्यात संभाव्य नावांविषयी चर्चा सुरू झाली आहे.  

...तर पुढचे पाऊल
माझ्या मुलीला विधानसभेत पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केला, तेही पुरावे मी वरिष्ठांना दिले आहेत. 
माझा काही गुन्हा असेल तर शिक्षा करा, भ्रष्टाचार केला असेल, तर कडक शिक्षा करा, चूक झाली असेल तर ते सांगा. झोटिंग समितीचा अहवाल क्लीन असल्यावरही माझ्यावर अन्याय का? मी काय गुन्हा केला आहे? याची उत्तरे पक्षाकडे मी मागणार आहे. सध्या या षडयंत्रावर पुस्तक लिहित आहे. त्यात सर्व बाबी पुराव्यानिशी मांडणार आहे. कोरोना संसर्गानंतर सर्व वरिष्ठांना दाखवेल. तरीही कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात पुढील पाऊल उचलणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख