पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्दच, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा  - Karthiki Yatra to Pandharpur canceled Government Maha Puja will be held at the hands of Deputy Chief Minister  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्दच, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

येत्या 26 नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. ता. 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे.  कार्तिकी सोहळा यंदा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होणार  आहे.  
येत्या 26 नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. ता. 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी असणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रा रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव पंढरपूर मंदिर समितीने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला होता.  शासनाकडून त्याला मान्यता मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.  

या शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी एसटीची वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालख्या आणि दिंड्याना यात्रा काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहर व परिसरातील सुमारे 350 मठ बंद ठेवण्यात येणार आहेत. सध्या पुणे विभागात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात निवडणूक होत असल्याने आचार संहिता लागू आहे. यामुळे कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याकडेच वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले होते.

दरम्यान निवडणुक आयुक्तांनी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय  महापूजा होणार आहे. 

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मुख दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. पदस्पर्श दर्शना ऐवजी मुख दर्शन सुरू करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दर्शन बुकिंग सुरू आहे.
दररोज दोन हजार भाविकांना ऑनलाईन दर्शन पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात्रा काळात ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

कार्तिकी खिलार जनावरांचा बाजारही रद्द 

कार्तिकी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला येथील खिलार जनावरांचा बाजार ही रद्द केला आहे.कार्तिकी खिलार जनावरांच्या बाजारात आंध्रप्रदेश, कर्नाटक मध्यप्रदेशासह राज्याच्या विविध भागातून जातिवंत खिलार जानवरे मोठ्या संख्येने  विक्रीसाठी येतात. बाजारात कोट्यावधी रूपयांची आर्थिक उलाढाल होते. कोरोनामुळे यावर्षीचा खिलार जनावरांचा बाजार भरणार नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख