कंगनाबाई, भिती वाटायला शिवसेनेने वाघ, सिंह पाळले आहेत का ?  - Kanganabai, have the Shiv Sena kept tigers and lions for fear? | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाबाई, भिती वाटायला शिवसेनेने वाघ, सिंह पाळले आहेत का ? 

प्रकाश पाटील 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत मुंबई सोडून आपल्या गावाला गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या रणरागिणीनला अचानक भिती कसली वाटायला लागली. मुंबईत काय वाघ, सिंह आहेत की काय ! म्हणून त्यांच्या हल्याची भिती वाटली ? 

मुंबई नगरी असे शहर आहे की तिनं भल्या भल्याना वेडं लावलं. ती गरीबांची तशी श्रीमंताची तशीच कष्टकऱ्यांचीही. देशात कोणी काही म्हणो मुंबईला तोड नाही. तिची तऱ्हाच न्यारी. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वर्षानुवर्षे लोक येथे येतात. देशातून पोट भरायला आणि करिअर करायला, नशीब अजमायलाही लोक येतात. येथे यशस्वी होता.

मुंबईच्या झगमगाटात अनेक तारेतारका चमकत राहिल्या. काहीने तिचे ऋण मानले तर काही कृतघ्न निघाले. मुंबईत खूप पैसा कमविला की त्यांना ती केंद्रशासीत व्हावी वाटते. ती महाराष्ट्रात नसावी आणि मराठी माणसांनी तिच्यावर हक्क सांगू नये असा समजगैरसमजही करून घेतात. 

पंजाब, हिमाचल प्रदेश, यूपी, बिहारमधून या शहरात आलेली असंख्य मंडळी आहेत. ते कदापी मुंबईविषयी वेडेवाकडे बोलत नाहीत. अमिताभ बच्चन यांनी तर आपल्या आयुष्यात मुंबईलाच महत्व दिले. ती माझी कर्मभूमी असल्याचे म्हटले. अमिताभप्रमाणे बॉलिवूडच्या मंडळींनी कधीही मुंबई सुरक्षित वाटते असे म्हटले नाही किंवा तिची तुलना पाकिस्तानशी केली नाही.

अभिनेत्री कंगना राणावत ही अशी पहिली अभिनेत्री निघाली की तिने मुंबईला पीओके म्हटले, त्यामुळे मराठी माणसाचे मन दुखावले गेले. शिवसेनेने तिला जे उत्तर द्यायचे ते दिले पण, तिचे घर पाडून उगाच तिला सहानुभूती मिळवून दिली. खरेतर काहीच कारण नव्हते तिचे घर पाडण्याचे. शिवसेना बरंच काही कमवते आणि लगेच तितकंच गमावतेही. 

मुंबईत मला भिती वाटत असल्याने मी मुंबई सोडत आहे. मुंबईला मी पीओके म्हटल्यापासून मला लक्ष्य करण्यात येत आहे. मी दहशतीखाली असल्याने अखेर मी हे शहर सोडून जात असल्याचे कंगनाने म्हटले आहे. आता ती तिच्या सिमल्यातील घरी गेली. तिच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यामध्ये ""जा दिल्या घरी सुखी राहा. पुन्हा येऊ नको. मी पुन्हा येणार असे म्हणू नको.

बिहारमध्ये जावून भाजपचा प्रचार कर, मादकद्रव्य सेवन केल्याने कारवाईच्या भितीने ती पळाली असे म्हटले आहेत. मात्र सर्वाच अधिक लोक तिला म्हणतात बाई, तू आता कधीच परतू नको. मुंबईत येऊ नको. तू नाही आलीस म्हणून आमचं काही बिघडत नाही. तुझ्या घरी आनंदात राहा अशा मजेदार प्रतिक्रियाही पाहण्यास मिळल्या. 

शिवसेनेने तिचे घर पाडल्यानंतर तिला सहानुभूती मिळाली होती. मात्र तिने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि नेटकरी तिच्यावर तुटूनच पडले. खरेतर तिला केंद्राने वाय सुरक्षा व्यवस्था दिली होती. मुंबई पोलीसही दिमतीला होते. एक मोठा राष्ट्रीय पक्ष भक्कमपणे तिच्या मागे आहे. हो खुद्द रामदासजी आठवले खंबीरपणे तिला साथ देत होते. इतका फौजफाटा मागे यापूर्वी कोणत्याही अभिनेत्रीच्या मागे असल्याचे दिसले नाही. तरीही तिला मुंबईत आताच कशी काय भिती वाटू लागली हे कळलं नाही.

यापूर्वी मुंबईची भिती का वाटली नाही. तिचं जर खरंच मुंबईवर प्रेम असतं तर तिने हा निर्णयच घेतला नसता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या रणरागिणीनला अचानक भिती कसली वाटायला लागली. मुंबईत शिवसेनेने काय वाघ, सिंह पाळले आहेत की काय ! म्हणून त्यांच्या हल्याची भिती वाटली ? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख