ट्रम्प यांना दे धक्का...अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन - Joe Biden will be the next United States President | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रम्प यांना दे धक्का...अमेरिकेच्या अध्यक्षपदी बायडेन

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ज्यो बायडेन यांनी पराभवाची धूळ चारली आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊससाठीच्या उत्कंठावर्धक शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अखेर विजयी ठरले आहेत. त्यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांचे दुसऱ्या टर्मचे स्वप्न बायडेन यांनी धुळीस मिळवले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सलग दुसरी टर्म न भूषवणारे डोनाल्ड ट्रम्प हे मागील 30 वर्षांतील पहिले अध्यक्ष ठरले आहेत. 

दरम्यान, आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये बायडेन यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला होता. तरीसुद्धा ट्रम्प मात्र माघार घ्यायला तयार नव्हेत. अनेक राज्यांतील मतमोजणी सुरू होती. त्यामुळे बायडेन यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक होती. 

या निकालांना कायदेशीर आव्हान देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने जोरदार तयारी केली आहे. मतमोजणीच्या चौथ्या दिवशीही निकालाचा सस्पेन्स कायम होता. बायडेन यांना अखेर 274 इतकी इलेक्टोरल मते मिळाली असून, ट्रम्प यांची गाडी २१४ मतांवरच थांबली आहे. 

राजकीयदृष्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पेनसिल्व्हानियातील २० इलेक्टोरल मते बायडेन यांच्या बाजूने पडल्याने त्यांनी सहज बहुमताचा म्हणजे २७० चा आकडा गाठला. जॉर्जिया, ॲरिझोना आणि नेवाडा या राज्यांमध्ये बायडेन यांनी आघाडी घेतली होती. या राज्यांमध्ये शुक्रवारीही मतमोजणी सुरूच होती. राष्ट्रीय पातळीवर मतांच्या बाबतीत बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. पेनसिल्व्हानियामध्ये बायडेन यांनी जोरदार मुसंडी मारली होती. 

बायडेन यांची अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी कमला हॅरीस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले होते. आता त्यांचा पराभव झाल्याने आगामी काळात भारत आणि अमेरिका संबंध कशाप्रकारे कायम राहतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited by Sanjay Jadhav

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख