Bihar Election Updates : नितीशकुमारांच्या जेडीयूने आधीच पराभव पत्करला..! - jdu leader k c tyagi says we are losing because of covid19 pandemic | Politics Marathi News - Sarkarnama

Bihar Election Updates : नितीशकुमारांच्या जेडीयूने आधीच पराभव पत्करला..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असून, चालू मतमोजणीत  महाआघाडीपेक्षा राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे पारडे जड दिसत आहे.  

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला हाती आलेल्या निष्कर्षानुसार महाआघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये  (एनडीए) रस्सीखेच सुरू होती. नंतर एनडीएने महाआघाडीच्या पुढे मजल मारली आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मात्र, सर्वांत मोठा धक्का बसला आहे. यामुळे जेडीयूने सुरूवातीलाच पराभव मान्य केला आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

मतमोजणीत दुपारी 12 वाजण्याच्या सुमारात एनडीएला एकूण 129 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा सातने वाढलेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 101 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा सहाने कमी झालेल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू  52 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 71 जागा होत्या. भाजपने 71 जागा, राष्ट्रीय जनता दल 65, काँग्रेस 23, लोक जनशक्ती पक्ष 7 आणि इतर 25 जागा असा कल दिसत आहे. 

जेडीयूचे ज्येष्ठ नेते के.सी.त्यागी यांनी पक्षाचा पराभव मान्य केला आहे. ते म्हणाले की, आमचा पराभव हा आरजेडी अथवा तेजस्वी यांच्यामुळे नव्हे तर कोरोनामुळे होत आहे. नैसर्गिक संकटाचा फटका आम्हाला बसला आहे. आमच्या ब्रँड नितीशकुमारला धक्का बसलेला नाही. मागील लोकसभा निवडणुकीत आरजेडीला एकही जागा मिळाली नव्हती. आरजेडीने मागील वर्षभरात काहीही केलेले नाही. 

चिराग पासवान यांच्यावरही त्यागी यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, चिराग पासवान यांनी नकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यांचे बिहारच्या राजकारणात आता काहीही अस्तित्व उरलेले नाही.  

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत चिराग पासवान हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले होते. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला होता. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख