जयाप्रदा म्हणतात, ''अमरसिंह माझे राजकीय गॉडफादर होते..'' - Jayaprada says, "Amar Singh was my political godfather." | Politics Marathi News - Sarkarnama

जयाप्रदा म्हणतात, ''अमरसिंह माझे राजकीय गॉडफादर होते..''

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भारतीय राजकारणात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. अमर सिंह माझे राजकीय गुरू आणि गॅाडफादर होते.

मुंबई : राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे काल सिंगापूर येथे निधन झाले. बॅालिवुडमधील अनेक कलाकारांशी अमर सिंह यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. बिग बी अमिताभ बच्चन यांनी काल त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेत्री जयाप्रदा यांनी टि्वटरवरून अमर सिंह यांच्याबाबत एक पोस्ट फोटोसह शेअर केली आहे. त्यात जयाप्रदा म्हणतात की अमर सिंह यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर खूप दुःखी झाले. 
 
जयाप्रदा टि्वटमध्ये म्हणतात, ''राज्यसभेचे खासदार अमर सिंह हे फक्त राजकीय व्यक्ती नव्हते तर ते सामाजिक काम करणारे व्यक्तीही होते. ते दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख समजतं असतं. भारतीय राजकारणात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. अमर सिंह माझे राजकीय गुरू आणि गॅाडफादर होते.

माझ्या दुःखात त्यांनी मला नेहमीच मदत केली. समाज सेवा करण्यासाठी मला प्रेरित केले. आज मी त्यांच्यामुळेच राजकारणात आहे. अमर सिंह साहेब आज आपल्यात नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही. त्यांच्या आत्माला शांती मिळावी, यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुंटुबियांना मिळो.
 
अमरसिंह यांचे काल दीर्घआजाराने निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. अमरसिंह यांना 2013 पासून मूत्रपिंड विकाराने ग्रासले होते. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सिंगापूरला हलविण्यात आले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अतिदक्षता विभागाच दाखल होते. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही रुग्णालयात उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी देशातील राजकारणात प्रत्येक पक्षात अमरसिंह हे परिचित नाव होते. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांचे ते निकटवर्ती होते. त्यांची बरीच कारकिर्द मुलायमसिंह यांच्यासोबतच गेली. अखेर मुलायम यांच्याशी संबंध बिघडल्याने त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता. समाजवादी पक्षात परत जाणार नाही, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती.

 

 

महानायक अमिताभ बच्चन यांच्याशीही अमरसिंह यांचे घनिष्ठ संबंध होते. अमरसिंह यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ज्येष्ठ नेते आणि खासदार अमरसिंह यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. सार्वजनिक जीवनात आम्ही दोघे मित्र होतो. त्यांचा स्वभाव विनोदी होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख