रत्नागिरी : विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारात माजी मुख्यमंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची `गंजलेली तोफ` म्हणून टीका केली होती. या टिकेला राणे यांनी उत्तर दिले. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर राहण्याचा दावा करून नये, असा टोला त्यांनी लगावला.
``पुढील पाच वर्षे हे सरकार राहिल, असे म्हणण्याचा अधिकार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना नाही. हे सरकार स्थापन झाले नसते तर पाटील भाजपमध्ये असते. मी आता काही बोलणार नाही, सांगलीत जाऊन त्यांचा समाचार घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
राणे यांचा दावा जयंत पाटील यांनी फेटाळला आहे. नारायण राणे साहेबांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असे ट्वीट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केले आहे.
आमदार नारायण राणे यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांची भाजप प्रवेशाबाबत टीका केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्यापुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा करत आहे. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील पाच वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवारसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
राणे यांची सरकारवर टीका
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे हे सरकार नाही. त्यामुळेच सुनावणी दरम्यान वकील गैरहजर राहिले आणि अपेक्षित कागदपत्रही दिली नाहीत. अशी भयावह परिस्थिती आरक्षणाबाबत आहे. स्थगिती उठावी, असा अर्जही सरकारणे दिलेला नाही, असे परखड मत भाजपचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत भयावह परिस्थिती आहे, असेच मी म्हणू शकतो. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडुन प्रयत्नच होत नाहीत. ओबीसीचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे राणे समितीच्या अहवालत कुठेही नाही. उलट कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता 52 टक्केच्या वर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती पाहुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असी शिफारस मी केली आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
भविष्यात सेना-भाजप अशी युती होणार नाही. मात्र लवकरच वेगळे सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीतील दोन पक्ष कुठेच दिसत नाही. उद्धव ठाकरे तेवढेच बोलताना दिसतात. यावरून दोन्ही पक्षांचे काय राजकारण सुरू आहे, हे तुम्हीच ओळखा. भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला घेऊन सत्ता स्थापन करणार का? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा खून झाला असून ती आत्महत्या असल्याचे दाखवून पचवले जात आहे,असा आरोप त्यानी केला.

