अनिल देशमुखांच्या मदतीला जयंत पाटील धावले... सीबीआयची कारवाई म्हणजे.... - jayant patil rushes to support Anil Deshmukh in CBI case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

अनिल देशमुखांच्या मदतीला जयंत पाटील धावले... सीबीआयची कारवाई म्हणजे....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

सीबीआय कारवाईचे राजकीय पडसाद 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयचे छापे मारण्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काॅंग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले असून या कारवाईबद्दल संशय व्यक्त केला आहे.

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस कमी पडल्याबद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सीबीआय कारवाईच्या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्यानुसार पाटील यांनी या कारवाईचा निषेध करत हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे इतर नेतेही या कारवाईच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही या कारवाईच्या विरोधात आवाज उठवला आहे. 

भाजपने घेतले अनिल परब यांचे नाव

''निंलबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि गँग यांच्यावर कारवाई होत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली आहे. आता काही दिवसात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही कारवाई होणार आहे. आणखी दोन मोठे नेते दोन हजार कोटींच्या वाटपात, हिशोबात सामील आहेत,'' असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा टाकला आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते.  ''मला विश्वास आहे की  एनआयए, ईडी यांनी चौकशी केली आता सीबीआय करत आहे. पुढे आयकर विभाग त्यांची चैाकशी करेल. ठाकरे सरकारच्या गैरव्यवहाराचा हिशोब जनतेसमोर येणार,'' असे किरीट सैामय्या म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख