सायरस मिस्त्रींना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला अन् रतन टाटा म्हणाले... - It is not an issue of winning or losing says ratan tata on supreme court verdict | Politics Marathi News - Sarkarnama

सायरस मिस्त्रींना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला अन् रतन टाटा म्हणाले...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मार्च 2021

सायरस मिस्त्री यांची अॉक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती.

नवी दिल्ली : टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्रींना दणका दिला. त्यामुळे टाटा समूहाला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर उद्योगपती रतन टाटा यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. मिस्त्री यांनी केलेल्या आरोपांनी रतन टाटा व्यथित झाले होते. 

सायरस मिस्त्री यांची अॉक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली होती. मिस्त्री कुटुंबियांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के एवढी भागीदारी आहे. मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरणाकडे दाद मागितली होती. डिसेंबर 2019 मध्ये न्यायाधीकरणाने मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्षपद बहाल करण्याचे आदेश दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालायने आज रद्द ठरविला. तसेच टाटा समूहाचा निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा : फडणवीसांना रश्मी शुक्लांनीच दिला होता तो 6.3 जीबी डेटा? कुंटेंच्या अहवालातून संकेत

या निकालानंतर रतन टाटा यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे मी स्वागत करून न्यायालयाचे आभार मानतो. हा मुद्दा जिंकणे किंवा हारण्याचा नाही. माझा प्रामाणिकपणा आणि समुहाच्या नैतिकतेवर सतत हल्ले झाल्यानंतर टाटा सन्सच्या मागण्या मान्य करणारा हा निकाल समूहाच्या मुल्य आणि नैतिकतेवर शिक्कामोर्तब करणारा आहे," असे टाटा यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा : धक्कादायक : भाजप नेत्यांच्या मुलांना पास करण्यासाठी एमबीबीएसच्या उत्तरपत्रिकाच बदलल्या

मिस्त्रींनी केले होते आरोप

दरम्यान, टाटा समूह आणि मिस्त्री यांच्यामधील वाद न्यायालयात असताना मिस्त्री यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला 2019 मध्ये सुमारे तेराशे कोटींचा तोटा झालो होता. मागील अनेक वर्षांत पहिल्यांदाच एवढा तोटा होऊनही तो लपविण्यात आला, असा दावा मिस्त्री यांनी न्यायालयात केला होता. हा तोटा 282 टक्केने वाढला आहे. टाटा समूहाची कामगिरी खालावत चालल्याचेही मिस्त्री यांनीही सांगितले होते. 

राष्ट्रीय न्यायाधीकरणाच्या निर्णयाविरोधात टाटा समूहाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांनीही वैयक्तिक याचिका दाखल करून मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मागील वर्षी 17 डिसेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. आज सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश, ए. एस. बोपण्णा आणि रामासुब्रमण्यमन यांच्या घटनापीठाने यांनी निकाल दिला. 

न्यायाधिकरणाने मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच टाटा समूहाने मिस्त्री यांना हटविण्याचा घेतलेला निर्णयही न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे मिस्त्री यांना धक्का बसला आहे. न्यायालयाने मिस्त्रींना टाटा सन्समधील शेअर्सशी संबंधित कोणतेही हस्तांतरण किंवा कोणतीही कार्यवाही न करण्याचा आदेशही दिला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख