तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार का..? - The issues of the state are different and no one is ready to talk about it seriously | Politics Marathi News - Sarkarnama

तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार का..?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल.

मुंबई : "जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे," असे मत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे.  

आरक्षणावरून सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखात राज्यातील प्रश्न कोणते, त्यावर चर्चा करायला हवी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, 'एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.' कोल्हापूर व सातारचे 'राजे' मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही.

कोरोनामुळे राज्यभरात जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडले आहे. अनेक व्यवसाय, छोटे उद्योग, मोठे व्यवसाय टप्प्याटप्प्याने 'अनलॉक' होत आहेत.'मिशन बिगिन अगेन'मध्ये अद्यापि देव, मंदिरे, जिम, लोकल सेवा यांना स्थान मिळालेले नाही. ज्यांचा पुनश्च हरिओम झाला आहे, ते व्यवसायही पूर्णपणे उघडता आलेले नाहीत. रेस्टॉरंट, बार वगैरे उघडा, पन्नास टक्के क्षमतेने चालवा, असे सरकारने सुचवले; पण ते चालविताना पालिका, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांशी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे धंदा करणेच नको अशी मानसिकता व्यावसायिकांत निर्माण झाली, असे दिसत आहे.

लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत गेल्या महिनाभरापासून वाढ झाली आहे. हे त्याचेच लक्षण आहे, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात..

  1. देवळांचेही एक अर्थकारण आहेच. दानपेटय़ांची उलाढाल राहू द्या बाजूला, पण हार, नारळ, फुले, पेढे विकणारे, पुजारी, कीर्तनकार यांचे कसे चालायचे? याचा विचार करावा लागेल
  2.  'जिम' उघडा असा तगादा या क्षेत्रातील लोक लावत आहेत. त्यांची वेदना कोणीतरी समजून घेतलीच पाहिजे. 
  3. मंत्री, आमदार, खासदार वगैरे मंडळी विशेष काळजी व अंतर ठेवूनही त्यांना कोरोनाने गाठलेच आहे. तशीच काळजी आम्ही घेऊ, बाकी सगळे भगवान भरोसे, पण आम्हाला आता जिम, देवळे उघडू द्या. नाही तर देवावरचाच लोकांचा विश्वास उडेल, अशी एक भावना आहे. 
  4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना या सर्वच मुद्दय़ांना स्पर्श केला. मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. नवरात्र, दिवाळीसारखे सण-उत्सव जवळ येत असताना एक एक पाऊल जपूनच टाकावे लागेल,
  5. शेवटी पालक म्हणून जनतेची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनीही योग्य खबरदारी घ्यायला हवी. 
     
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख