इंदिराजींमुळे भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान आणि आदर : अनिल देशमुख   - Indiraji gives India international honor and respect : Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

इंदिराजींमुळे भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान आणि आदर : अनिल देशमुख  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

क्षमाशीलता, समानता आणि सद्भावना यांना जीवनधर्म मानून राज्यकर्त्यांनी राजधर्म कसा पाळावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला," असे देशमुख म्हणाले. 

मुंबई : "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नेत्या होत्या. बलाढ्य राष्ट्रांच्या दादागिरीपुढेही त्या कधी झुकल्या नाहीत, मात्र त्याच वेळी शेजारी देशांमध्येही त्यांनी स्वत:विषयी आदराची भावना निर्माण केली होती," असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमीत्त आदरांजली अर्पण करताना ते बोलत होते. "इंदिरा गांधी यांनी देशाची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतू, तत्त्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. क्षमाशीलता, समानता आणि सद्भावना यांना जीवनधर्म मानून राज्यकर्त्यांनी राजधर्म कसा पाळावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला," असे देशमुख म्हणाले. 

"संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने त्या व्यथित झाल्या होत्या. त्यामुळेच तत्कालिन पंतप्रधान पंडीत नेहरू यांचे मन त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीच्या बाजुने वळविले. याचे कारण म्हणजे त्यांचे महाराष्ट्राशी खास ऋणानुबंध होते. पंडित नेहरु नगरच्या तुरुंगात असताना इंदिराजींचे शालेय शिक्षण पुण्यातल्या हुजुरपागा शाळेत झाले. त्या पुढे अलाहाबादला गेल्यानंतर पंडीतजी त्यांच्यासाठी पुण्यातून उत्तमोत्तम पुस्तके मागवित.  दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, विनोबा भावे आदी मराठी देशभक्तांबद्दल त्यांच्या मनात विशेष आदराचे स्थान होते. मुंबई त्यांच्या पसंतीचे शहर होते. मराठी पेहराव आणि मराठी खाद्य संस्कृती त्यांच्या आवडीची होती,'' असे देशमुख म्हणाले. 

देशमुख म्हणाले, "बांगला देशातील निष्पाप जनतेवरील अत्याचारांमुळे मानवतेच्या भूमिकेतून त्यांनी बांगला देश मुक्ती वाहिनीला पाठिंबा दिला. काही बलाढ्य राष्ट्रे पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने असतानाही त्यांनी पाकिस्तानविरुध्द युध्द पुकारले. त्यावेळी बड्या राष्ट्रांच्या अध्यक्षांकडून इंदिराजींना धमकावण्याचे प्रयत्न झाले, पण त्यांनी हा दबाव झुगारुन दिला. यामुळेच कोट्यवधी बांगलादेशी जनतेची पाकिस्तानच्या जुलमी राजवटीतून मुक्तता होऊ शकली. पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्यांनी जन्माचा धडा शिकविला, पण याचा उपयोग त्यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी कधी केला नाही." 

भारताचे सैनिकी बळ वाढवितानाच मुत्सदीपणाने जगातील अनेक देशांना सोबत घेतले. शांततेसाठी अणुशक्तीचा वापर हे धोरण ठरविताना भारताला आण्विक शक्ती बनविले. स्त्रिया, दलित, वंचित, गरीब यांना सन्मानाने जगता यावे, हा ध्यास त्यांनी घेतला होता. इंदिराजींचे योगदान आणि बलिदान हा देश कधीही विसरु शकणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख