शहरात होणारे स्थलांतर  तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरेल
3Sarkarnama_20Banner_20_202021_05_19T094458.270.jpg

शहरात होणारे स्थलांतर तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरेल

तिसऱ्या लाटेला ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर कारणीभूत ठरेल, असा स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.

पुणे :  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्थितीबाबत याआधी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील Johns Hopkins University शॉन ट्रुलोव्ह आणि भारतातील शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या ‘इंडसाय-सीम’ या संघटनेने प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र अभ्यास केले आहेत. यापैकी `इंडसाय-सीम’च्या संशोधनात पुणे  Pune शहरातील तिसऱ्या लाटेला ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर कारणीभूत ठरेल, असा स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.

पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही कायम दहा हजारांच्या घरात राहत आहे. मात्र याआधी जूनच्या मध्यात ही संख्या साडेसात हजारांवर आली होती. त्यात पुन्हा वाढ होऊन ती ३० जुलैपर्यंत साडेनऊ हजारांच्या आसपास होती. त्यानंतर २३ आॅगस्टला ही संख्या आठ हजारांच्या खाली आली होती. त्यात आता आणखी वाढ होऊन ती पुन्हा साडेनऊ हजारांच्या  आसपास पोचली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे. सध्या पुणे शहर व जिल्ह्यात मिळून एकूण ९ हजार २६५ सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. यापैकी फक्त जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ४ हजार ७३९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. याउलट सध्या पुणे शहरात २ हजार ३६३ तर, पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ३६१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील (ग्रामीण) सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी निम्म्ह्याहून अधिक रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. काल अखेर जिल्ह्यात एकूण ९ हजार ३२७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात पोचली आहे.
 
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रोजच्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही कमी होत नसून उलट दिवसेंदिवस ती वाढू लागली आहे. शहर व जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामीण भागात रोज सरासरी किमान पाचशेहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. ग्रामीणमधील रुग्णवाढीमुळे पुणे शहरातील संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. यामुळे पुणेकरांनी यापुढेही कोरोनाबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.