सरकारी कामांमधील दिंरगाई हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारचे महत्वाचे पाऊल.. - Important steps of Modi government to eradicate delays in government work.   | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारी कामांमधील दिंरगाई हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारचे महत्वाचे पाऊल..

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व मंत्रालयांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात पायाभूत योजनांची कामे ठरलेल्या मुदतीतच पूर्ण करण्यावर कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

दिल्ली : विविध मंत्रालयांच्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी त्या त्या योजनेची जबाबदारी निश्‍चित करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. 

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व मंत्रालयांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात पायाभूत योजनांची कामे ठरलेल्या मुदतीतच पूर्ण करण्यावर कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारी कामांमधील लेटलतीफी हद्दपार करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या पत्राची भाषाही कडकपणे व समज देण्याच्या धर्तीची आहे. 

सध्या चालू असलेल्या व यापूर्वीच्या पण प्रलंबित असलेल्या योजनांबाबत निश्‍चित वेळापत्रक आखावे. काम पूर्ण होण्यास विलंब झाला तर कडक पावले उचलावीत व त्यांच्या कामांची जबाबदारी निश्‍चित करावी, असे सांगून पत्रात म्हटले आहे की कोणत्याही योजनेला विलंब झाला तर लागणारा वेळ व पैसा देशाच्या विकासातच अडथळा ठरतो व आवश्‍यक त्या साधन सामग्रीवरही त्याचा गंभीर परिणाम होते. पायाभूत सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास त्याबाबत संबंधित मंत्रालयातील उच्चपदस्थांना केंद्राकडे सविस्तर खुलासा द्यावा लागेल. योजना दिलेल्या मुदतीतच पूर्ण कराव्यात यासाठी सरकारने वारंवार स्पष्ट निर्देश दिले. तरीही या पैलूकडे आवश्‍यक तेवढ्या गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याचे दिसते. "सरकारनामा'कडे या पत्राची प्रत आहे. 

कोरोनामुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे व ती रूळावर आणण्याचे प्रयत्न केंद्राने वेगवान केलेले असतानाच गौबा यांचा हा पत्राचार लक्षणीय मानला जातो. कॅबिनेट सचिवालयाने यावर्षी जुलैतही कॅबीनेट बैठकीत योजना मांडतानाच ती पूर्ण होण्याची कालमर्यादा व त्याला विलंब झाला तर कोण जबाबदार असणार याचा स्पष्ट उल्लेख त्यात असावा. कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत तर वेळ व पैशाची बरबादी होते ती टाळणे या वेळी कधी नव्हे इतके आवश्‍यक आहे असेही सचिवालयाने म्हटले होते. 

रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल 12 वर्षांच्या विलंबानंतर पूर्ण झालेल्या एका कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अधिकाऱ्यांना नुकतेच झापले होते. ""तुमचे अभिनंदन करतानाही मला लाज वाटते. या कामाला इतका विलंब करणाऱ्यांचे फोटो त्या कार्यालयात जागोजागी लावा,'' असेही गडकरी कडाडले होते. गौबा यांच्या ताज्या पत्राची भाषा गडकरींइतकी तिखट नसली तरी कामे वेळेत न करण्याच्या वृत्तीबदद्‌ल तंबी देण्याचा आशय तोच दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख