Important discussion between Sambhaji Raje and Ajit Pawar today ... | Sarkarnama

संभाजीराजें आणि अजित पवार यांच्यात आज महत्वपूर्ण चर्चा...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 जुलै 2020

सारथी संस्थेबाबत राज्य सरकारवर काही दिवसापासून विविध आरोप होत आहेत. या विषयावर आज (ता.9)  मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलवली आहे.

मुंबई : सारथी संस्थेबाबत राज्य सरकारवर काही दिवसापासून विविध आरोप होत आहेत. या विषयावर आज (ता.9)  मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला संभाजीराजेंसह मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले आहे.

दोन दिवसापूर्वी या बैठकीबाबत मंत्री विजय वड्डेटीवार यांनी माहिती दिली होती.  सारथी संस्थेचे अनुदान, स्वायत्तता, शिष्यवृत्ती, तारदूत प्रकल्प याविषयावरून काही दिवसापासून ठाकरे सरकारवर टिका होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते होऊ दिले नाही.  गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलोशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असल्याचेही संभाजीराजे यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते. सरकारने  यापूर्वी जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाहीत. तरीही समाजाच्या हितासाठी आपण या चर्चेला जात असल्याचं छत्रपती संभाजी यांनी यावेळी म्हटलं आहे. 

सारथी संस्थेला भाजपपेक्षा महाविकास आघाडी सरकारने जादा निधी दिल्याचा दावा मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मंत्री विजय वडेट्टीवार हे सारथी संस्थेबाबत हे चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. वड्डेटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्याठिकाणी दुसरा सक्षम मंत्री नेमावा आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा ने केली आहे. हे आरोप निराधार असल्याचे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.
 
विजय वडेट्टीवार म्हणाले, ''सारथी संस्थेची स्थापना 3 जानेवारी 2017 रोजी झाली. 2017-2018 या दरम्यान सारथीसाठी कुठलेली आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. 2018-2019 या वर्षी संस्थेला पाच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. यात साडेतीन कोटी रूपये संस्थेच्या अन्य  खर्चावर व दीड कोटी रूपये हे वेतनावर खर्च करण्यात आले. 2019-2020 या वर्षी 28.80 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. 2020-2021 या वर्षी महाविकास आघाडीच्या सरकारने 50 कोटींचा निधी सारथीला दिला.''

तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीने संस्थेत स्पर्धा परीक्षा, पीएच.डी, एमफील, फेलोशीप आदीबाबत काम करावे अशी सूचना केली होती. सारथी संस्था ही स्वायत संस्था आहे. संस्थेला विद्यार्थी निवडणे, अभ्यासक्रम निवडणे, तरूणांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणे याबाबत स्वायतता आहे. पण निधी मंजूरीचे अधिकारी हे राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे आहे. पण संस्थेने अधिकार नसताना अनेक नवीन योजना राबविल्या. या योजना राबविण्यासाठी त्यांनी वित्त विभागाची परवानगी घेणे गरजेचे होते. संस्थेकडून प्रस्ताव आला की मंजूर होत नसतो. तो प्रस्ताव वित्त विभागाकडे जातो. माझ्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.  

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख