'रेमडेसिवीर' बाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय... - Important decision of the state government regarding Remedesivir Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

'रेमडेसिवीर' बाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

रेमडेसिवीरचं वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

जालना  : राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय त्यामुळे रेमडेसिवीरचं वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. जालना येथे आज टोपे यांच्या हस्ते खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना १० हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  

रेमडेसिवीरचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून टेंडर पद्धतीनं हापकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल तर  प्रत्येक जिल्ह्यात एक स्टोकीस्ट असणार असून त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे.  

जिल्हाधिकारी खाजगी रुग्णालयाची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करेल, या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. यातून खाजगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, कोणतंही राज्य या संदर्भात मदत करायला तयार नसून आपक्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ब्रेक द चैन संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावं असंही टोपे म्हणाले.

सध्या ऑक्सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या 15 दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारत असून यात यश मिळालं तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल, असंही टोपे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख