महाराष्ट्रात आणीबाणी लागू करा..माजी आमदाराचे पंतप्रधान मोदींना पत्र   - Implement emergency Letter of former MLA Ashish Deshmukh to Prime Minister Modi | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात आणीबाणी लागू करा..माजी आमदाराचे पंतप्रधान मोदींना पत्र  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

महाराष्ट्रात  आर्थिक आणि आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

नागपूर : कोविडमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात किमान दोन महिने आर्थिक आणि आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या ३.८४ दशलक्ष असून मृत्यूंचा आकडा ६० हजार ४७३ आहे. दुसरी लाट राज्य सरकारच्या आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेसह महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीस अधिक घातक ठरत आहे. सध्या दररोज ६० हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि जीवनरक्षक औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, असे देशमुख यांनी म्हटलं आहे. 

''महाराष्ट्र राज्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली आहे. मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी घाटावर प्रतीक्षा करावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचीसुद्धा कमतरता आहे. परिस्थिती आणखी खराब होऊ नये म्हणून केंद्राने हस्तक्षेप करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याकरिता राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६० अन्वये महाराष्ट्रात आरोग्य तसेच आर्थिक आणीबाणीची घोषणा करावी आणि लोकांचा जीव वाचवावा, अशी विनंती डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख