मुंबई : मुख्यमंत्री म्हणून मीच पाच वर्षे राहणार आहे. हिंमत असेल तर माझे सरकार आज या क्षणी देखील पाडून दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
मुंबईत एका मुलाखतीत ठाकरे यांनी याबाबतचे मत स्पष्टपणे मांडले. `आधी आमदार फुटणार म्हणून सांगितले जात होते. फुटायला तो काही काचेचा ग्लास आहे का, अशी खिल्ली उडवत सरकार स्थिर असल्याचे स्पष्ट केले. असला फुटकळपणा आमच्यात नाही. तसा असता तर आम्ही एकत्र आलोच नसतो. आधी सरकार पाडण्याचा प्रयत्न होता, आता आमदार फुटणार असे म्हटले जाते. माझा आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. सत्तेचे आम्ही काही लालची नव्हतो. आमच्याकडे किती काळ सत्ता होती आणि नव्हती, हे जनतेला माहिती आहे, असे ठाकरे म्हणाले.
`माझे मुख्यमंत्रिपदाच वैयक्तिक स्वप्न नव्हते. पण माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनणार नसेल तर मी पक्ष कशाला चालवू. ठाकरे कुटुंबातल कोणी सत्तेवर येणार नाही, याचा अर्थ आम्ही आव्हानांना घाबरतो, असे नाही. देशात पक्षांचे प्रमुखच मुख्यमंत्रिपदी बसले आहेत. आम्ही ते पद घेत नव्हतो. आता त्या पदावर आलो आहे. एवढाच आता बदल झालायं, असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही. मी भाजपपासून दूर झालेलो आहे. हिंदुत्वापासून दूर झालेलो नाही. हिंदुत्वाचे पेटंट त्यांनीच घेतलेले नाही, असे ठाकरेंनी सांगितले. देशभरात भाजपला पर्यायची पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढणे गरजेचे आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी एकटा पक्ष तो देऊ शकेल किंवा इतर पक्ष एकत्र येऊन पर्याय देऊ शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तीस कोटी झाडे लावणारे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटिवार आणि ठाकरे यांची काल भेट झाली. त्यावर बोलताना त्या झाडांना फळ येणार नसल्याचा टोमणा त्यांनी मारला. निदान त्यांनी मूळावर तर घाव घालू नये, असा टोला त्यांनी मारला.

