शाळा सुरू करायच्या असतील तर विद्यार्थी, शिक्षकांना प्रथम कोरोनाची लस द्या  - If schools are to be started, students, teachers should be corona vaccinated against first | Politics Marathi News - Sarkarnama

शाळा सुरू करायच्या असतील तर विद्यार्थी, शिक्षकांना प्रथम कोरोनाची लस द्या 

सुशील कुलकर्णी 
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड-19 लस पहिल्यांदा कोणाला टोचायची, याबद्दलचे प्राधान्यक्रम ठरवले आहेत.

मुंबई : कोविड योद्धांसोबतच कोरोनाची लस ही विद्यार्थी, शिक्षक आणि बालकांना देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड-19 लस पहिल्यांदा कोणाला टोचायची, याबद्दलचे प्राधान्यक्रम ठरवले आहेत. यामध्ये लहान मुलांचा कुठेही उल्लेख नाही. शाळा, महाविद्यालये लवकर सुरू करायचे असतील, तर कोविड योद्धांसोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांनाही लस देण्याची गरज असल्याची बाब पाटील यांनी पत्रातून अधोरेखित केली आहे. पाटील यांच्यासोबतच पालकांकडूनही याबाबतची मागणी होत आहे. 

पत्रात पाटील यांनी म्हटले आहे की, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोविडची लस घेतल्याची पूर्वअट असायला हवी. त्यासाठी शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक आणि बालके यांचा लस देण्याच्या प्राधान्यक्रमात समावेश करावा.

मुंबईत प्रवासासाठी लोकलची सुविधा मिळत नसतानाही कोविड आणि ऑनलाइन शिक्षणाची डबल ड्यूटी शिक्षक करत आहेत. त्यांना पुन्हा शाळेत 50 टक्के उपस्थिती लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही बाब आजाराला आमंत्रण देण्यासारखी आहे. त्यातून शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी शिक्षकांना शाळा, महाविद्यालयांमध्ये तूर्त बोलवू नये. त्यांना कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत.

याबाबत शिक्षण विभागाला आदेश देण्यात यावेत, अशी विनंती शिक्षक आमदार पाटील यांनी पत्रातून मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. 

कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याबाबतची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच झाली. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. या बाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे तूर्तास शाळा या दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांना सरकारला पत्राद्वारे ही विनंती केली आहे. 

Edited By vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख