शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर खुशाल मंत्र्यांचे कपडे फाडा !  - If the farmers are going to get better, tear the clothes of Khushal ministers! | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर खुशाल मंत्र्यांचे कपडे फाडा ! 

प्रकाश पाटील 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020


 शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी माणसाचं जगणं मोठं अवघड होऊन बसलंय. सर्वत्र प्रकाशाऐवजी अंधारच अधिक दाटून आलेला दिसतोय.अशाच मंत्र्यांचे कपडे फाडून काय करणार ! 
 

शेतकऱ्यांच्या संकटाकडे पाहिले की कोणालाही संताप येणे स्वाभाविकच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रवी तुपकर असो सदाभाऊ खोत की आणखी 
कोणी असतील त्यांना शेतकऱ्यांविषयी शेतीविषयी जी तळमळ आहे. त्याबाबत दूमत असण्याचे कारणही नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न कोणतेही सरकार पूूर्णपणे सोडवू शकत नाही. 

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच त्याला बसतो. आज शेती करणं सोप राहिलं नाही. गारपिट झाली की वादळ, पाऊस येतो. नैसर्गिक संकटात शेतीचं होत्याचं नव्हतं होतं. कस जगायचं, काय करायचं. पोटाची खळगी कशी भरायची असे एक ना अनेक प्रश्‍न. या जिवघेण्या प्रश्‍नांच्या चक्रव्यहातून शेतकरी कधीच बाहेर पडू शकत नाही. संकटाची मालिका थांबण्यास काही थांबत नाही. 

शेतकरी संकटात आला की मायबाप सरकारलाही धडकी बसते. शेतकऱ्यांना काही द्यायचे नाही असे नाही मात्र, राज्यावरही मोठे संकट आले आहे. कोरोनामुळे तर आर्थिक घडी पार बिघडून गेलीय. तरीही सरकार दोन लाख का होईना माफ करण्यास तयार झाले. ही माफी देण्याचे काम सुरू असताना दुसरे संकट. मागचं मिठवावं तर पुढे लगेच संकट. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस. त्यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ लक्षात येते. शेतकऱ्यांना देऊ नका असे कोणीच म्हणणार नाही. परंतू आताच्या घडीला राज्य सरकारची परिस्थिती अतिशय वाईट आहे. राज्यही संकटातून जात आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

या सर्व गोष्टीकडे लक्ष वेधण्याचे कारण असे की मंत्र्यांना कोणी बदडण्याची, कोणी कपडे फाडण्याची भाषा करतात. शेतकऱ्यांचे दु:ख पाहिले तर कोणालाही संताप येणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांनाही मागितल्याशिवाय, आंदोलनं, जाळपोळ केल्याशिवाय पदरात काही पडत नाही हे चित्रही वर्षोनुवर्षे पाहण्यास मिळत आहे. परंतु आज संघर्ष, जाळपोळ कपडे पाडण्याचे दिवस नक्कीच राहिलेले नाहीत. 

शेतकऱ्यांप्रमाणे सरकारच्या अडचणीही लक्षात घ्यायला हव्यात. थोडं थंड डोकं ठेवून सरकारशी शेतकरी नेत्यांनी वाटाघाटी करायला हव्यात. तसे न होता मंत्र्यांना कपडे फाडण्याची धमकी कशासाठी. स्वाभिमानीचे फायरब्रॅंड नेते रविकांत तुपकर यांनी तसा इशारा दिला आहे. जर तुपकर कपडे फाडणार असतील मंत्र्यांनी अंगावर कपडे घालावे की नको. त्यांनी एक ड्रेस फाडला तर त्यांच्याकडे दुसरा ड्रेस असतो. त्यांना कपड्याची काही कमी नाही.

पण, मंत्र्यांजवळ जाणं, त्यांच्या शर्टाला हात घालणं सोप नाही. याचा अर्थ राज्यात नेत्यांचे कपडे फाडले नाहीत असे नाही. घाटकोपरमध्ये आज केंद्रात मंत्री असलेल्या एका नेत्याचे कपडे फाडून कशी मारहाण झाली होते हे आपण पाहिले आहे. म्हणून कोणाचे कपडे फाडणं अवघड काही नाही. 

पोलिसांबरोबर वादावादी होणार. त्यातून संघर्ष उडणार, पोलीसही दंडुका उघारणार. याचा अर्थ शेतकरी किंवा संघटनांचे नेते पोलिसांना घाबरतात असे नव्हे. तरीही काळवेळाचे भान ठेवण्याची गरज आहे. शेतकरी संघटनांनी आतापर्यंत हजारो आंदोलने केली आहेत. त्यामुळे असे कपडे फाडण्याचे आंदोलन नवेही नाही. मात्र दिवस सध्या बरे नाही हे खरे. लोकांच्या हाताला काम नाही. रोजगार बुडाले आहेत. 

शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी माणसाचं जगणं मोठं अवघड बसलंय. सर्वत्र प्रकाशाऐवजी अंधारच अधिक दाटून आलेला दिसतोय. अशा अंधारात प्रकाशाचा किरण दिसतो का हे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे कधी नव्हे ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या हातावर दोन पैसे कसे पडतील. त्याची दिवाळी कशी चांगली जाईल.

त्याला सुखासमाधानचे दिवस कसे येतील याचा विचार व्हावा हीच अपेक्षा ! असो, तरीही जर का कपडे फाडून शेतकऱ्यांचं भलं होणार असेल तर मग तसे कपडे फाडण्यासही काहीच हरकत नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख