दोन महिला 'आयएएस'मधील वाद विकोपाला; सरकारकडून दोघींचीही बदली - IAS Officers Involved in Tussle in Mysuru Transferred | Politics Marathi News - Sarkarnama

दोन महिला 'आयएएस'मधील वाद विकोपाला; सरकारकडून दोघींचीही बदली

वृत्तसंस्था
रविवार, 6 जून 2021

शिल्पा नाग (Shilpa Nag) आणि रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) अशी या महिला आयएएसची नावे आहेत.

म्हैसूर : दोन महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला पोहचला आहे. एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप केल्याने दोघींमधील वादाने प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून दोन्ही अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. राज्य सरकारने बदली करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (IAS Officers Involved in Tussle in Mysuru Transferred)

म्हैसूर (Mysore) महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग (Shilpa Nag) आणि जिल्हाधिकारी रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) अशी या महिला आयएएसची नावे आहेत. सिंदुरी या छळ करत असल्याचा आरोप करत नाग यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यावेळी दोघींमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर सिंदुरी यांनीही याबाबत खुलासा करत नाग यांचे आरोप फेटाळून लावले होते. 

हेही वाचा : अमेरिकेला कोव्हॅक्सिनची अॅलर्जी; लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांचे दरवाजे बंद

राज्याचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी दोघींमधील वादाची काल रात्री माहिती घेतली. त्यानंतर दोघींची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच बदलीचे आदेशही काढण्यात आले. सिंदुरी यांची केवळ आठ महिन्यांपूर्वीच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची बदली बेंगलुरू येथे हिंदु रिलिजियस अॅन्ड चॅरिटेबल संस्थेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नाग यांना ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे (ई-गव्हर्नन्स) संचालक करण्यात आले आहे. 

काय आहे प्रकरण?

राजीनाम्या दिल्याची घोषणा नाग यांनी आज पत्रकार परिषदेत केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, आज मी राजीनामा देत आहे. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी येथे योग्य वातावरण नाही. कुणीही माझ्यासारखे अशा परिस्थितीतून जाऊ नये. जिल्हा उपायुक्त रोहिणी सिंदुरी यांनी माझा अपमान केला आहे. मी माझा राजीनामा मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सिंदुरी या लक्ष्य करीत आहेत. महापालिकेने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. परंतु, याचे श्रेय जिल्हा प्रशासन घेत आहे. 

रोहिणी सिंदुरी यांनी त्यांच्या बचावासाठी मांडलेले पाच मुद्दे मांडले होते. मी शिल्पा नाग यांचा कोणताही छळ केलेला नाही आणि त्यांनी अशा एकाही घटनेचा उल्लेखही केलेला नाही. कोरोना संकटाच्या काळात माझ्यावर कोरोना महामारीच्या हाताळणीची जबाबदारी आहे. कोरोनाचे नियंत्रण करण्यावर माझा पूर्णपणे भर असून, माझ्यावरील जबाबदारी पूर्ण करण्याला माझे प्राधान्य आहे. शिल्पा नाग या मागील काही काळापासून कोरोना आढावा बैठकांना उपस्थित राहत नाहीत. म्हैसूर शहर महापालिका कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्या याबद्दल विरोधाभासी माहिती देत आहेत. यात सुधारणा करण्याचे आदेश मी दिले होते. कल्पनाविलास केला तरी यातील एकही बाब छळ होत नाही. 

जिल्ह्यातील खासगी उद्योग, कारखाने, आयटी कंपन्या यांच्याकडून सीएसआरसाठी येत असलेल्या निधीची जबाबदारी नाग यांच्यावर होती. परंतु, त्यांनी हा निधी केवळ म्हैसूर महापालिकेवरच खर्च केला. यामुळे मी संपूर्ण खर्चाचा तपशील त्यांच्याकडे मागितला होता. मागील दहा दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये शिल्पा नाग या जिल्हा प्रशासनाविरोधात बोलत आहेत. अशा प्रकारचे वर्तन म्हैसूर शहराच्या आयुक्तांना शोभनीय नाही, असे सिंदुरी यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख