... तर राजीनामा देणार! मुख्यमंत्रीपदाबाबत येदियुरप्पांचं मोठं विधान - I will resign the day party high command asks me to quit says CM BS Yediyurappa | Politics Marathi News - Sarkarnama

... तर राजीनामा देणार! मुख्यमंत्रीपदाबाबत येदियुरप्पांचं मोठं विधान

वृत्तसंस्था
रविवार, 6 जून 2021

राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर येदियुरप्पा यांनी आज काही स्पष्ट संकेतही दिले आहे.

बेंगलुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येदियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांचे पद जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) आमदारांकडूनच पक्ष नेतृत्वावर दबाव टाकला जात आहे. वाढते वय तसेच कामाच्या पध्दतीवर नाराजी असलेल्या काही आमदारांनी त्यांची तक्रारही नेतृत्वाकडे केली आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. (I will resign the day party high command asks me to quit says CM BS Yediyurappa)

राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर येदियुरप्पा यांनी आज काही स्पष्ट संकेतही दिले आहे. 79 वर्षांच्या येदियुरप्पा यांनी पहिल्यांदाच या चर्चेवरील आपले मौन सोडले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दिल्लीतील नेतृत्वाला जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर कायम असेन. ज्यादिवशी त्यांना मी नको असेन, त्याचदिवशी मी राजीनामा देऊन राज्याच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करेन, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. 

हेही वाचा : योगींना मोदींसह शहा, नड्डा यांनी दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा? हे आहे कारण...

येदियुरप्पा यांनी राज्यात त्यांना पर्यायी नेता नसल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. पर्यायी नेता नसल्याचे मी मान्य करत नाही. मी कुणावरही टीका करणार नाही. राज्य आणि देशात नेहमीच पर्यायी व्यक्ती असते. त्यामुळं कर्नाटकतही पर्यायी व्यक्ती नाही, याच्याशी मी सहमत नाही. पण जोपर्यंत पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्री राहील, असेही येदियुरप्पा यांनी सांगितले. 

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींपासून (L K Advani) सुमित्रा महाजनांपर्यंतच्या वरिष्ठ नेत्यांना लावलेला पंच्याहत्तरीचा निकष भाजप सर्वेसर्वा नेतृत्वाने येदीयुरप्पा यांच्यासाठी बाजूला ठेवला होता. मात्र आता बदलत्या परिस्थितीत 79 वर्षीय येदियुरप्पा यांची घटलेली लोकप्रियता, त्यांची घराणेशाही, त्यांच्या विरुद्ध एका वादग्रस्त सीडीचे प्रकरण आणि त्यांच्याविरुद्धचा पक्ष संघटनेतील असंतोष यामुळे त्यांना बदलणे भाग आहे असे भाजप आमदारांपैकी बहुसंख्य्यांचे मत आहे.

येडीयुरप्पा यांचे वय झालेले असताना त्यांच्या बी. बाय. विजयेंद्र आणि खासदार बी वाय राघवेंद्र या दोन मुलांच्या दबावाखाली कर्नाटकमधील भाजप संघटन गुदमरत असल्याचा जाहीर आरोप होत आहे. भाजप आमदारांपैकी किमान निम्म्या आमदारांनी येदियुरप्पा यांच्या घराणेशाहीविरुद्ध भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. येदीयुरप्पा यांनी कर्नाटकातील सामाजिक समीकरणांच्या जोरावर भाजपमध्ये अभेद्य स्थान मिळवले आहे. जनाधार आणि पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावर जोरावर येदियुरप्पा यांनी अनेकदा भाजपच्या नेतृत्वाला वाकवले आहे. अलीकडे येदियुरप्पा यांचे एक वादग्रस्त सीडी प्रकरण कर्नाटकच्या (Karnataka) राजकीय वर्तुळात गाजत आहे. 

येदियुरप्पा विरोधी गटातील एका भाजप आमदाराने नुकतेच दिल्लीत येऊन येदियुरप्पा यांच्या तुझ्या सीडी आख्यानाचे 'दर्शन' पक्षनेतृत्वाला घडविले असे वृत्त आहे. आता त्यांच्याविरुद्ध नवे संकट पक्षांतर्गत आणि पक्षाच्या धोरणाच्या संदर्भात लक्षणीय आहे. येदियुरप्पा यांच्या दोन्ही मुलांची राज्य सरकार आणि प्रशासनातील वाढती लुडबुड सत्तारुढ आमदारांना चांगलीच खुपू लागली आहे. या नाराजीने आता मुखर रूप धारण केले आहे. केंद्रातील प्रल्हाद जोशी व राज्यातील के. एस ईश्वरप्पा, लक्ष्मण सावधी, डॉ सी. एन अश्वथ नारायण, गोविंद करजोल आदी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. 

या वर्षाअखेर केंद्रीय नेतृत्व कर्नाटकमध्ये भाकरी फिरवेल व केंद्रातील कोणी नेता कर्नाटकात पाठवेल असा विश्वास येदियुरप्पा पुत्रांना आव्हान देणारे आमदार व्यक्त करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भाजपच्या मातृसंस्थेतील सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष दोन वरिष्ठ नेते कर्नाटकातलेच आहेत. केंद्रीय नेतृत्वाकडून या वेळेला येदियुरप्पा यांना अजिबात पाठिंबा न मिळण्याचे तेही ठळक कारण सांगितले जाते. मोदीयुगात ज्या मोजक्या भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वऐवजी स्वतःचे मत चालविले त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, हिमाचलाचे प्रेमकुमार धूमल यांच्यानंतर येदियुरप्पा यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजप आमदारांनामध्ये असलेला असंतोषाचा वणवा त्यांना एकट्यालाच निस्तरू द्यावा व संधी मिळताच लवकरात लवकर भाकरी पलटावी अशी भूमिका सध्या भाजप नेतृत्वाने घेतली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख