मी मरेपर्यंत राजू शेट्टींसोबत जाणार नाही.. - i will not go with Raju shetty till my death says sadabhau khot | Politics Marathi News - Sarkarnama

मी मरेपर्यंत राजू शेट्टींसोबत जाणार नाही..

शेखर जोशी
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

शेट्टी आणि खोत यांच्यात पुन्हा सामना रंगला...

सांगली : एक काळ शेट्‌टींना माझा हात आमरसासारखा गोड वाटत होता.पण, आता त्यांना तो कडू वाटत आहे, हा त्यांनी ज्या चोरांशी संगत केली त्याचा हा परिणाम आहे. मी मरेपर्यंत कधीही शेट्‌टींसोबत जाणार नाही, असा
पलटवार माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी `सरकारनामाशी` बोलताना केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्‌टी यांनी सदाभाऊ खोतयांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यावर पलटवार करताना रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, काही इलेक्‍ट्रॉनिकमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी पुन्हा मैत्रीसाठी त्यांच्याकडे हात केलेला नाही. मी एवढेच म्हणालो होतो की, त्यांनी जर अलीबाबा आणि 40 चोर यांची संगत सोडली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आम्ही एकत्र होऊ शकतो. प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी मी एकत्र येण्याबाबत बोललो होते. मात्र, शेट्‌टींना माझे हात आता बरबटलेले वाटतात.

एक काळ हेच हात त्यांना आमरसासारखे गोड वाटत होते. त्यांना आताबारामतीकरांचा आमरस आवडू लागला आहे. तेथे जाऊन त्यांनी तो ओरपलेला आहे. त्यामुळे आमचा हात कडू लागत आहे. मला हाकलून देण्याची भाषा त्यांनी केली असल्याने आता एकीचा प्रश्‍नच नाही, पण मी त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी याचना केलेली नाही. ते भ्रमात आहेत. हातकणंगले मतदार संघातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी  भ्रमातून बाहेर यावे आणि या जन्मात तरी त्यांच्याशी मी कधीही एकत्र येऊ शकत नाही. माझी रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसाठी लढत राहील असा पलटवार आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख